विश्वकप २०१९ : स्पर्धेतील ‘या’ फॉरमॅटवर सचिन तेंडूलकर नाराज

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन – आयसीसी क्रिकेट वर्ल्डकप २०१९ ची सुरूवात आजपासून होत आहे. इंग्लंडमधील ११ शहरांत तब्बल ४८ सामने रंगणार आहेत. क्रिकेट प्रेमींसाठी हा क्रिकेटचा कुंभमेळाच आहे. जगातील सर्वोत्तम १० देशांचा समावेश असलेली हि स्पर्धा चार वर्षातून एकदा खेळवण्यात येते. त्यामुळे जगभरातील क्रिकेट रसिक याकडे डोळे लावून बसलेले असतात. सर्वच संघ यासाठी जोरदार तयारी करता आहेत. आजपासून सुरु होणाऱ्या या स्पर्धेत दक्षिण आफ्रिका आणि यजमान इंग्लंड यांच्यात उदघाटनाचा सामना खेळवला जाईल. यावर्षी हा विश्वकप रॉबिन राऊंड पद्धतीने खेळवला जाणार आहे. मात्र यावर भारताचा माजी फलंदाज सचिन तेंडुलकर याने टीका केली आहे. या पद्धतीमुळे जास्तीत जास्त संघाना या स्पर्धेत सहभाग घेता येत नाही, असे त्याने म्हटले आहे.

वर्ल्ड कपमध्ये जास्त संघांना खेळण्याची संधी मिळायला पाहिजे असं त्याला वाटते. लहान संघांविषयी बोलताना सचिन तेंडुलकर म्हणाला कि, लहान संघांना वर्ल्ड कपमध्ये स्वत:ला सिद्ध करण्याची संधी मिळते. जास्तीत जास्त संघाना सहभागी होण्यासाठी संधी द्यायला हवी. हे करत असताना क्रिकेटचा दर्जा आणि नियमांचा भंग होणार नाही याचीही काळजी घ्यायला हवा असं सचिनने म्हटलं.

दरम्यान, याआधी वर्ल्ड कपमध्ये १४ संघांना सहभागी होता येत असे. मात्र रॉबिन राऊंड प्रकारामुळे दहापेक्षा अधिक संघाना या स्पर्धेत भाग घेता येत नाही. यामुळे झिम्बॉम्बे, आयर्लंड, नेदरलँड, युएईसारख्या देशांना संधी मिळू शकली नाही.

काय आहे रॉबिन राऊंड पद्धत

रॉबिन राऊंड पद्धतीत प्रत्येक संघाला एकमेकांविरुद्ध सामने खेळावे लागतात. सहभागी १० संघाना प्रत्येकी ९ सामने खेळावे लागतात. यात सर्वात वर असणारे चार संघ सेमीफायनल मध्ये खेळतात. यात पहिल्या क्रमांकावर असलेल्या संघाचा चौथ्या क्रमांकावर असलेल्या संघाशी सामना होतो तर दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या संघात सामना होतो.