#Video : ‘इंग्लंडवर आमचं सर्जिकल स्ट्राईक’ ; नेहमी पाकवर टीका करणाऱ्या शोएब अख्तरचा ‘तो’ व्हिडीओ व्हायरल..

लंडन : वृत्तसंस्था – वर्ल्डकप सामन्यात काल पाकिस्तानने इंग्लडला १४ धावांनी पराभूत करत आपली सलग ११ पराभवांची मालिका खंडित केली. त्यामुळे पहिल्या सामन्यात विंडीजकडून दारुण पराभव पत्करावा लागल्यानंतर काल त्यांनी यजमान इंग्लंडला पराभूत करून सर्वांना धक्का दिला. या विजयानंतर पाकिस्तान संघ आणि कर्णधारावर नेहमी टीका करणारा पाकिस्तानचा माजी खेळाडू शोएब अख्तर याचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. इंग्लंडवर पाकिस्तानच्या संघाने सर्जिकल स्ट्राईक केल्याचे या व्हिडिओमध्ये म्हंटले आहे. त्यानंतर, या भारतीय चाहत्यांनी शोएबची चांगलीच शाळा घेतली आहे. कारण पाकिस्ताननं भारतावर एकदाही विजय मिळवलेला नाही.

काल झालेल्या सामन्यात पाकिस्तानने इंग्लंडला ३४९ धावांचे लक्ष दिले होते. या सामन्यात पाकिस्तानकडून मोहम्मद हाफिज, बाबर आझम, सरफराज अहमद यांनी अर्धशतकी खेळी करत मोठी धावसंख्या उभारली. त्या धावांचा पाठलाग करताना इंग्लंडकडून जो रूट आणि जोस बटलर यांनी शतकी खेळी केली, मात्र इंग्लंडला सामना जिंकता आला नाही. पाकिस्तानने १४ धावांनी विजय मिळवला.

या सामन्यानंतर अख्तरने एका व्हिडीओद्वारे संवाद साधत म्हटले कि, आजच्या सामन्यात काहीच अघटीत नव्हते. आमचा कर्णधार जागा झाला आहे. पाकिस्तानं आपल्या ताकदीच्या जोरावर हा सामना जिंकला आहे. मी आधीच म्हणालो होतो, पाकिस्तानचा संघ इंग्लंडवर सर्जिकल स्ट्राईक करेल, आणि तसेच झाले. याआधी शोएबनं सर्फराजवर टीका केली होती. सर्फराजवर टीका करताना म्हटले होते कि, हा कर्णधार कसा झाला, सर्वात अनफिट खेळाडू आहे, ज्याचं तोंड मोठं आहे, ज्याचं पोट मोठ आहे. तो कसा कर्णधार झाला, असा सवाल करत टीका केली होती.