T-20 वर्ल्डकपबाबत आलं मोठं ‘अपडेट’, जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम – जगभरात कोरोना संसर्गाने धुमाकूळ घातला आहे. कोरोनामुळे जगभरातील सर्वच देशांत चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून, काही क्रीडा स्पर्धा रद्द करण्यात आल्या आहे तर काही पुढे ढकलल्या गेल्या आहे. जपानमध्ये होणारी ऑलम्पिक स्पर्धा देखील कोरोना संसर्गामुळे पुढे ढकलण्यात आली आहे. मात्र, क्रिकेट चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे.

भारतीय संघ देखील ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर जाणार होता. मात्र हा दौरा कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर रद्द होणार असे सांगितले जात होते. कारण ऑस्ट्रेलियाने सहा महिने आपली आंतराष्ट्रीय विमानसेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे दौरा होणार नसेल तर, ऑस्ट्रोलियात ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धा देखील कशी होणार याबाबत क्रिकेट चाहत्यांना साशंकता होती. ऑस्ट्रेलियामध्ये ऑक्टोबर- नोव्हेंबर महिन्यात ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेबाबत आतापर्यंत कोणतेच अपडेट आले नव्हते. पण आता ट्वेन्टी-२० विश्वचषक समितीमधील एका सदस्याने याबतीत सकारात्मक अशी बातमी दिली आहे.

ट्वेन्टी-२० विश्वचषकाच्या आयोजन समितीमधील मुख्य कार्यकारी अधिकारी निक हॉक्ले यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, “विश्वचषक खेळवण्यासाठी परिस्थिती कशी चांगली होईल, याचा आम्ही विचार करत आहोत. जेणेकरून आम्हाला विश्वचषक नियोजित वेळेत कसा खेळवता येईल, यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. त्यामुळे विश्वचषकाचे आयोजन ठरलेल्या वेळेत होईल, असा आम्हाला विश्वास आहे. तसेच आम्ही आयसीसी आणि सर्व देशांच्या संपर्कात असून, काही बदल करायचा असेल तर आम्ही त्यांना पूर्व सुचना नक्कीच देऊ. मात्र सध्याच्या घडीला विश्वचषकासाठी सात महिन्याचा कालावधी आहे. त्यामुळे कमी वेळात जास्ती काम करायचं आहे. तसेच आयसीसीनेदेखील यापूर्वीच स्पष्ट केले आहे की, ट्वेन्टी-२० विश्वचषक रद्द करण्याचा प्रश्नच येत नाही. त्यामुळे आयसीसीकडून आम्हाला पाठिंबा मिळाला आहे.