World Cup : T-20 वर्ल्ड कप 2022 पर्यंत होऊ शकतं ‘स्थगित’

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रभावामुळे जगभरातील सर्व क्रिकेट स्पर्धा रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे क्रिकेट प्रेमींची नाराजी झालेली आहे. दरम्यान ऑस्ट्रेलियामध्ये ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात टी-20 वर्ल्ड कप स्पर्धा खेळली जाणार होती, मात्र ती स्पर्धा देखील पुढे ढकलण्याचे संकेत मिळत आहेत. ही स्पर्धा तब्बल दोन वर्ष म्हणजेच 2022 पर्यंत पुढे ढकलण्यात येईल अशी शक्यता आयसीसीने वर्तविली आहे. या पार्श्वभूमीवर 28 मे ला आयसीसीची बैठक होणार आहे.

ऑक्टोबर 2021 मध्ये भारताला याआधीच टी-20 वर्ल्ड कपचे यजमानपद देण्यात आले आहे. तसेच एका वर्षात दोन विश्वचषक स्पर्धांचे आयोजन करणे हे अनुचित आहे. सध्या असलेली परिस्थिती लक्षात घेता आयसीसी अजून सहा महिने तरी कोणताही मोठी स्पर्धा आयोजित करणार नाही हे स्पष्ट आहे. कोरोनामुळे असे निर्णय घेणे भाग पडत असून या निर्णयांमुळे क्रिकेट प्रेमींना आणि होस्ट ब्रॉडकास्टर स्टार स्पोर्ट्सना मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे.

ऑक्टोबरमध्ये जर भारतात आयपीएलचे आयोजन करण्यात आले तर 6 महिन्यात 2 आयपीएल आणि 2021 मध्ये 2 वर्ल्ड कप स्पर्धेंचे आयोजन करणे शक्य होणार नाही. या कारणामुळेच टी-20 वर्ल्ड कपला 2022 पर्यंत स्थगिती देण्याचा निर्णय आयसीसीकडून घेतला जाऊ शकतो. त्यामुळे ही नियोजित स्पर्धा रद्द तर नाही होणार पण ही स्पर्धा पुढे ढकलण्यात येईल अशी माहिती सूत्रांकडून समोर येत आहे.