ICC test ranking मध्ये ‘विराट कोहली’ला नुकसान, जाणून घ्या कोण-कोणते भारतीय फलंदाज ‘टॉप 10’ मध्ये

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आयसीसीच्या ताज्या टेस्ट रँकिंगमध्ये विराट कोहलीला नुकसान झाले आणि ते एका स्थानाने खाली आले आहेत. भारताविरुद्ध चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत चांगली कामगिरी करणारे ऑस्ट्रेलियन फलंदाज मार्नस लाबुशाने आता तिसर्‍या क्रमांकावर आले आहेत तर विराट कोहली चौथ्या स्थानावर घसरले आहेत. न्यूझीलंडचे कर्णधार केन विल्यमसन प्रथम तर स्टीव्ह स्मिथ दुसर्‍या स्थानावर आहेत. पहिल्या दहा फलंदाजांविषयी बोलायचे झाले तर विराटशिवाय चेतेश्वर पुजारा सहाव्या स्थानी आहेत. पुजाराने एक स्थान मिळवले असून सातव्या स्थानावरून ते सहाव्या स्थानावर आले आहेत. त्याशिवाय अजिंक्य रहाणेनेही एक स्थान मिळवले असून नवव्या स्थानावरुन ते आठव्या स्थानावर आले आहेत.

विराट कोहलीने ऑस्ट्रेलियाविरुद्ध फक्त एक कसोटी सामना खेळला होता आणि तीन कसोटी सामन्यात ते संघाचा भाग नव्हते, त्यामुळे त्यांना नुकसान झाले. त्याचवेळी लाबुशानेने चार सामन्यात 53.25 च्या सरासरीने एकूण 426 धावा केल्या. त्याचबरोबर स्टीव्ह स्मिथने चार सामन्यांत 313 धावा केल्या. फलंदाजांच्या क्रमवारीत पाचव्या क्रमांकावर असणार्‍या जो रूटने श्रीलंकेविरुद्ध शानदार फलंदाजी करत दोन कसोटी सामन्यांत 400 पेक्षा जास्त धावा केल्या. तर बाबर आजम सातव्या क्रमांकावर आहेत.

कसोटीतील गोलंदाजांच्या क्रमवारीबद्दल चर्चा केली तर आर अश्विन पहिल्या दहामध्ये आठव्या आणि जसप्रीत बुमराह नवव्या स्थानी आहेत. पॅट कमिन्स पहिल्या क्रमांकावर तर स्टुअर्ट ब्रॉड दुसर्‍या क्रमांकावर आहेत. जेम्स अँडरसन सहाव्या स्थानावर आले आहेत.