U-19 : गतविजेत्या भारतीय संघाला धक्का, बांगलादेशला पहिले विजेतेपद

पॉटशेफस्टूम : वृत्तसंस्था – भारताचा तीन विकेटनी पराभव करत बांगलादेशने पहिल्यांदा आयसीसी 19 वर्षाखालील वर्ल्ड कप जेतेपदावर नाव कोरले. भारताने विजयासाठी दिलेले 178 धावांचे आव्हान बांगलादेशाने 7 गड्यांच्या मोबदल्यात पार केले. या पराभवामुळे भारताचे विक्रमी पाचवे विजेतेपद मिळवण्याचे स्वप्न भंगले. कमी धावसंख्येच्या या सामन्यात भारताने बागलादेशाला विजयासाठी संघर्ष करण्यास भाग पाडले.

भारताने पहिल्यांदा फलंदाजी करताना 178 धावांचे आव्हान ठेवले. भारताच्या सलामीच्या जोडीने चांगली सुरुवात केली. मात्र गोलंदाजांनी खराब कामगिरी केली. अखेर संघाच्या मदतीला आला तो रवी बिश्नोई. त्याने बांगलादेशाची अवस्था शून्य बाद 54 वरून 4 बाद 65 अशी केली. बिश्नोईने प्रथम तांझिद हसनची विकेट घेत बांगलादेशाला पहिला झटका दिला. त्यानंतर तीन विकेट घेतल्या.

बांगलादेशाने नाणेफेक जिंकून भारताला पहिल्यांदा फलंदाजी करण्याचे आमंत्रण दिले. कर्णधाराचा निर्णय योग्य ठरवत बांगलादेशाच्या गोलंदाजांनी शानदार गोलंदाजी केली. पहिली दोन षटके निर्धाव टाकत त्यांनी भारतीय फलंदाजांवर दबाव टाकला. दहा षटकांमध्ये भारताची स्थिती 1 बाद 23 होती. त्यानंतर दिव्यांशच्या जागी आलेल्या तिलक वर्माने याशस्वी सोबत दुसऱ्या विकेटसाठी 94 धावांची भागीदारी केली. या महत्त्वपूर्ण सामन्यामध्ये सलामीवीर यशस्वी जयस्वाल वगळता भारताच्या इतर कोणत्याही फलंदाजाला कमाल करता आली नाही. त्यामुळे भारताचा डाव 47.2 षटकात सर्वबाद 177 धावांवर आटोपला.