विश्वकप २०१९ : गुगलची एक चूक अन् जगात पोहोचला विराट कोहली !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – विश्वचषकाला सुरुवात होऊन दोन दिवस झाले असून मोठ्या प्रमाणात चाहत्यांचा पाठिंबा संघाना मिळताना दिसून येत आहे. भारतीय संघ आपला पहिला सामना ५ जून रोजी दक्षिण आफ्रिकेबरोबर खेळणार आहे. त्याआधीच भारतीय संघाचा कर्णधार चर्चेत आला आहे.

भारतीय संघाला शुभेच्छा देण्यासाठी गुगल Duo या व्हिडीओ कॉलिंग अ‍ॅपने एक व्हिडीओ बनवला आहे. पण, हा व्हिडीओ चुकून जगभरातील युजर्सना पाठवला आणि त्यावर स्पष्टीकरण देण्याची नामुष्की गुगलवर ओढावली. एखाद्या विशिष्ट दिवशी किंवा स्पर्धेसाठी गुगल अशा प्रकारचे शुभेच्छा देणारे व्हिडीओ पाठवत असतो. यामुळे विराट कोहली संपूर्ण जगात पोहोचला आणि विविध देशातील गुगल Duo युजर्सनी हा व्हिडीओ पाठ्वण्यामागचे कारण विचारले.

वर्ल्ड कप स्पर्धेच्या निमित्ताने भारतीय कर्णधार विराट कोहलीचा एक व्हिडीओ भारतातील गुगल Duo युजर्सना पाठवायचा होता. मात्र चुकून हा व्हिडीओ पाठवताना तो भारत वगळता सर्व देशांना पाठवला गेला. शिवाय त्याचे नोटीफिकेशनही गेले. अमेरिका, कॅनडा, जपान, मॅक्सिको आणि न्यूझीलंड आदी देशांतील यूझर्सला ह्या व्हिडीओचे नोटिफिकेशन गेल्याने त्यांनी सोशल मीडियावरून गुगलला यासंदर्भात प्रश्न विचारले.

दरम्यान, गुगलने यावर स्पष्टीकरण देताना सांगितले की, आमच्याकडून चूक झाली. ही कोणतीही जाहीरात नसून भारतीय संघाला दिलेल्या शुभेच्छा होत्या. हा व्हिडीओ जगभरातील युजर्सकडे जायला नको होता. अशी चूक पुन्हा होणार नाही.”त्यामुळे गुगलच्या एका छोट्याश्या चुकीमुळे भारतीय कर्णधार विराट कोहली जगभरात पोहोचला.