ICC World Cup 2019 : विजय शंकर सलग तिसऱ्या सामन्यात अपयशी ; ऋषभ पंतला मिळणार संधी ?

मँचेस्टर : वर्ल्डकपमधील वेस्टइंडीजविरुद्ध झालेल्या सामन्यात भारताने विजय मिळवला असला तरी भारताची मधली फलंदाजी पुन्हा एकदा कमकुवत ठरली आहे. मधल्या फळीतील दोन प्रमुख फलंदाज विजय शंकर आणि केदार जाधव वेस्टइंडीज विरुद्धच्या अपयशी ठरले आहेत. विजय शंकर तर सलग तिसऱ्या सामन्यात अपयशी ठरला आहे. शिखर धवन जखमी झाल्यानंतर विजय शंकरचा भारतीय संघात समावेश करण्यात आला होता. मात्र विजय शंकरला तीन सामन्यात विशेष कामगिरी करता आलेली नाही. आता त्याच्या जागी युवा फलंदाज ऋषभ पंतला संधी मिळू शकते.

वर्ल्डकपसाठी जेव्हा भारतीय संघाची घोषणा झाली तेव्हा विजय शंकरला नंबर चार वरील उपयुक्त फलंदाज म्हणून घेण्यात आले होते. फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या तिन्हीमधील विजयची गुणवत्ता पाहून निवड समितीचे अध्यक्ष एमएसके प्रसाद यांनी विजयला ३ डी खेळाडू म्हंटले होते. गेल्या तीन सामन्यातील कामगिरी पाहता विजय स्वतःला सिद्ध करू शकलेला नाही.

मागील तीन सामन्यातील विजयची कामगिरी

विजय शंकरने पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात १५, अफगाणिस्तानविरुद्ध २९ आणि वेस्टइंडीजविरुद्ध १४ धावा बनवल्या आहेत. या धावा विजयचे अपयश दाखवून देत आहेत. पाकिस्तानच्या विरुद्ध विजयला दोन विकेट मिळवत्या आल्या परंतु त्यानंतर झालेल्या अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात विराट कोहलीने गोलंदाजी करण्याची संधीच दिली नाही.

विजयच्या जागी ऋषभ पंतला पसंती
ऋषभ पंत युवा खेळाडू असून स्फोटक फलंदाजीसाठी ओळखला जातो. त्याने आतापर्यंत केवळ ५ आंतरराष्ट्रीय सामने खेळली आहे. कसोटी संघात ऋषभने चांगली कामगिरी केली आहे. इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया विरुद्ध झालेल्या कसोटी सामन्यात शतक झळकावले होते. ऋषभ पंत डाव्या हाताने फलंदाजी करतो. भारताच्या मधल्या फळीत डाव्या हाताने फलंदाजी करणारा एकही फलंदाज नाही.
आरोग्य विषयक वृत्त-
छातीत होणाऱ्या वेदनांकडे दुर्लक्ष नको , होऊ शकतो हा ‘आजार’
वजन कमी करण्यासाठी वेगन डाएट ला अनेकांची पसंती
चेहऱ्यावर काळे डाग आहेत का ? हे घरगुती रामबाण उपाय करा
डोळ्यांवरून समजू शकते; तुमचे आरोग्य कसे आहे