SAच्या फलंदाजांची दांडी ‘गुल’, रोहित शर्माचा ‘जलवा’ ; भारताचा 6 विकेटनी ‘विजय’

लंडन : वृत्तसंस्था – वर्ल्डकपमधील क्रिकेट चाहत्यांचे लक्ष लागून असलेल्या भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झालेल्या सामन्यात भारताने दणदणीत विजय मिळविला आहे. रोहित शर्माने केलेल्या शतकाच्या जोरावर भारताने हा विजय मिळविला आहे. विराट कोहली १८, केएल राहुल ३४ तर महेंद्रसिंग धोनीने ३४ धावांचे योगदान दिले.
२२८ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताची सुरुवात फारशी चांगली झाली नाही. सलामीवीर शिखर धवन पाचव्या षटकातील रबाडाच्या  पहिल्याच चेंडुवर त्रिफळाचित झाला. यानंतर कर्णधार विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्यात दुसऱ्या विकेटसाठी ४१ धावांची  भागीदारी झाली. कर्णधार विराट कोहली मोठी खेळी करण्यात अपयशी ठरला. कोहली केवळ १८ धाव करून बाद झाला. यानंतर लोकेश राहुल आणि रोहितने पुन्हा एकदा भागीदारी रचत संघाचा डाव सावरला.

लोकेश राहुल रबाडाच्या गोलंदाजीवर सहज झेल देत बाद झाला. यानंतर रोहित शर्माने महेंद्रसिंह धोनीच्या साथीने आपलं शतक साजरं करत भारताला विजयाच्या नजीक पोहचवलं. विजयासाठी अवघ्या काही धावा शिल्लक असताना धोनी ३४ धावांवर झेलबाद झाला. यानंतर रोहित शर्माने हार्दिक पांड्याच्या साथीने भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.

तत्पूर्वी, नाणेफेक जिंकून फलंदाजीला उतरलेल्या दक्षिण आफ्रिकेला २२७ धावांवर रोखण्यात भारतीय गोलंदाजांना यश मिळाले. फिरकी गोलंदाज यजुवेंद्र चहलने ४ गडी बाद केले तर जसप्रीत बुमराह आणि भुवनेश्वर कुमारने प्रत्येकी दोन गडी बाद केले.