ICC World Cup 2019 : ‘टॉस’ जिंकून पाकिस्तानने मारली स्वतःच्याच पायावर ‘कुर्‍हाड’, जाणून घ्या कारण

लंडन : वृत्त संस्था – वर्ल्डकपमध्ये आज सर्वांचे लक्ष लागून राहिलेल्या भारत – पाकिस्तान सामन्यात  पाकिस्तानने टॉस जिंकून भारताला फलंदाजीला आमंत्रित केले आहे. इंग्लंडमधील मैदानावर पहिल्यांदा फलंदाजी करणे कोणत्याही संघासाठी फायदेशीर ठरते मात्र पाकिस्तानने टॉस जिंकून भारताला फलंदाजीला बोलावून स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेतली आहे.

भारताची फलंदाजी ही सध्या चांगली कामगिरी करताना दिसते. आणि या वर्ल्डकपमध्ये आतापर्यंत झालेल्या बऱ्याच सामन्यात जो संघ पहिल्यांदा फलंदाजी करतो त्या संघाचा विजय झालेला आहे. त्यामुळे पाकिस्तानने घेतलेला हा निर्णय भारताच्या पथ्यावर पडू शकतो.

भारताकडे असलेले जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, हार्दिक पांड्या हे वेगवान गोलंदाज सध्याच्या घडीला चांगलेच फॉर्मात आहेत. पाकिस्तानच्या फलंदाजांना या गोलंदाजांचा वेगवान मारा चांगलाच जड जाऊ शकतो. भारतीय गोलंदाज पाकिस्तानच्या फलंदाजांना लक्ष्य गाठण्यापासून रोखण्यास सहज यशस्वी ठरू शकतात. शिवाय भारतीय संघाची सांघिक कामगिरी हे भारताचे बलस्थान आहे. सांघिक कामगिरीची भारतीय गोलंदाजांना सुरेख साथ मिळाल्यास पाकिस्तानच्या फलंदाजांना लक्ष्याचा पाठलाग करणे अवघड जाणार आहे. जखमी शिखर धवनच्या जागी लोकेश राहुल सलामीला फलंदाजी करत आहे.