आता तुम्ही घरबसल्या करू शकता कोरोनाची चाचणी, ICMR ने कोविड टेस्ट किटसाठी दिली मंजूरी; अ‍ॅडव्हायजरी जारी, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्त संस्था – कोरोना संकटात आयसीएमआरने मोठा निर्णय घेतला आहे. आयसीएमआरने कोविड-19 होम टेस्टिंग किटसाठी मंजूरी दिली आहे. यामध्ये रॅपिड अँटीजन टेस्ट तंत्रज्ञान वापरले जाईल, ज्यासाठी बुधवारी अ‍ॅडव्हायजरी जारी करण्यात आली आहे. आयसीएमआरकडून महाराष्ट्राची एक कंपनी माय लॅब मध्ये तयार करण्यात आलेल्या किटला मंजूरी दिली आहे.

आयसीएमआरनुसार, ज्या लोकांना घरबसल्या आपली कोरोना टेस्ट करायची आहे त्यांनी सर्वप्रथम गुगलवर जाऊन याबाबत मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करावे. त्यानंतर जसे किटवर दिले आहे त्यानुसार करा ज्याद्वारे समजेल की, व्यक्ती कोरोना संक्रमित आहे किंवा नाही. या तंत्रज्ञानाचा वापर भारताच्या अगोदर परदेशांमध्ये होत आहे.

लक्षणे असतील तरच वापरा
आयसीएमआरने सल्ला दिला आहे की, या किटचा वापर कोरोनाची लक्षणे दिसत असतील किंवा संक्रमित व्यक्तीच्या संपर्कात आल्यावरच करावा. मायलॅब डिस्कव्हरी सोल्यूशन लिमिटेडने बनवलेल्या या किटचे नाव कोव्हिसेल्फ टीएम (पॅथोकॅच)कोविड-19 ओटीसी अँटिजेन एलएफ आहे.

दरम्यान, वारंवार ही टेस्ट न करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. टेस्ट केल्यानंतर स्ट्रिपवर आलेल्या रिझल्टचा फोटो काढण्याचा सुद्धा सल्ला देण्यात आला आहे. हा फोटो त्याच फोनमध्ये सेव्ह करा ज्यामध्ये टेस्ट किटशी संबंधीत मोबाईल अ‍ॅप आहे. तसचे जर कुणाला कोरोनाची लक्षणे आहेत, परंतु या टेस्ट किटने सुद्धा निगेटिव्ह येत असेल तर त्यांनी आरटी-पीसीआर टेस्ट आवश्यक करावी. स्वॅब, टेस्ट किट इत्यादी साहित्य कसे नष्ट करावे, यासाठी निर्देश दिले आहेत, त्यांचे सक्तीने पालन झाले पाहिजे.