‘कोरोना’ संसर्गाविरुद्ध भारतात BCG लस करेल काम ? ICMR नं सुरु केली चाचणी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशात कोरोना विषाणूची प्रकरणे झपाट्याने वाढत आहेत. देशातील लोक लसीची प्रतीक्षा करत आहेत. या दरम्यान मुंबईत आजपासून कोरोना विषाणूविरूद्ध बीसीजी लसीच्या परिणामाचा अभ्यास करण्यासाठी चाचणी सुरू केली जात आहे. कोरोनाविरूद्ध भारताची बीसीजी लस काम करेल की नाही, हे आगामी काळात समजेल.

बृहन्मुंबई महानगरपालिकेने आयसीएमआर-बीसीजी लसीची चाचणी सुरू केली आहे. बीएमसी अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, बीसीजीची लस सहसा क्षय (टीबी) असलेल्या मुलांना दिली जाते. इतर श्वसन रोगांमध्येही या लसीचा उपयोग चांगला असल्याचे सिद्ध झाले आहे. बीएमसीने सांगितले की, सेठ जी एस मेडिकल कॉलेज, नागरिक संचालित केईएम हॉस्पिटल आणि बीएमसीचा आरोग्य विभाग संयुक्तपणे भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदे (आयसीएमआर) साठी याचा अभ्यास करेल.

भारतात १९४९ पासून नवजात मुलांना बीसीजीची लस दिली जात आहे. मात्र वृद्ध लोकांमध्ये कोरोना रोखण्यासाठी बीसीजी लस किती फायदेशीर ठरू शकते, याचा अभ्यास आयसीएमआर करत आहे. जगभरात कोरोनाची प्रकरणे पाहिल्यास हा आजार वृद्ध लोकांना अधिक होत आहे आणि त्याचे गंभीर परिणाम होतात. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचे वय देखील ६० वर्षांपेक्षा जास्त आहे. हा अभ्यास मुंबई व्यतिरिक्त नवी दिल्ली, चेन्नई, अहमदाबाद, भोपाळ आणि जोधपूरमध्येही केला जात आहे.

अभ्यासामध्ये भाग घेणारे स्वयंसेवक जवळजवळ सहा महिने बारकाईने परीक्षण करतील. अभ्यासाचा हेतू हा आहे की, ही लस कोरोना विषाणूचा संसर्ग रोखू शकते का? आणि ती हॉटस्पॉट्समध्ये राहणाऱ्या वृद्ध लोकांमधील या आजाराची तीव्रता आणि मृत्यू दर कमी करू शकते.

विशेष म्हणजे सध्या देशातील तीन कोरोना लसींची वेगवेगळ्या टप्प्यात चाचणी चालू आहे. यामध्ये भारत बायोटेक-आयसीएमआरची कोवॅक्सीन, जाईड्स कॅडिलाची जायकॉव्ह-डी आणि ऑक्सफर्डची लस कोव्हीशील्ड यांचा समावेश आहे. ऑक्सफर्ड लसीच्या दुसर्‍या व तिसर्‍या टप्प्यातील चाचण्या सुरू झाल्या आहेत.