‘कोरोना’ची लस दरवर्षी घ्यावी लागणार, ICMR च्या महासंचालकांनी दिले संकेत

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जगभर हाहाकार घातलेल्या कोरोनावर लस आल्यानंतर देखील काही समस्यांना सामोर जावं लागणार आहे. कोरोना टाळण्यासाठी लोकांना दरवर्षी लस घ्यावी लागू शकते असे संकेत आयसीएमआरचे महासंचालक डॉ बलराम भार्गव यांनी दिले आहेत. यासाठी त्यांनी फ्लू आणि इन्फ्लून्झा विषाणूचं उदाहरण देखील दिलं आहे. फ्लू आणि इन्फ्लूएन्झा टाळण्यासाठी दरवर्षीच लस घ्यावी लागते.

शरीरात प्रतिपिंडाचा कालावधी (अँटीबॉडीज) संदर्भातील प्रश्नाला उत्तर देताना डॉ भार्गव म्हणाले, सध्या याबद्दल स्पष्ट असं काहीही सांगितलं जाऊ शकत नाही. हा विषाणू नवीन असून तो केवळ 6-7 महिन्यांपासून आला आहे. म्हणून या संदर्भात कोणतंही वैज्ञानिक तथ्य समोर आलेलं नाही. विविध वैज्ञानिक अभ्यासात विविध दावे केले जाताना दिसत आहेत.

डॉ भार्गव म्हणाले, एकदा संसर्ग झाल्यानंतर प्रतिपिंडे (अँटीबॉडीज) शरीरात 6 महिने ते वर्षभर राहतात असं म्हणतात. परंतु परिस्थिती पूर्णपणे निवळण्यास वेळ लागेल. डॉ भार्गव यांच्या मते श्वसन प्रणालीवर हल्ला करणाऱ्या 2 विषाणूंविषयी संपूर्ण माहिती उपलब्ध आहे. त्यापैकी एक फ्लू आणि दुसरा इंफ्लूएन्झा आहे. हे दोन्हीही विषाणू वेगानं बदलतात. या कारणामुळं त्यांची प्रतिपिंडे (अँटीबॉडीज) दीर्घकालीन संरक्षणासाठी प्रभावी नाहीत. वृद्ध लोक ज्यांची रोगप्रतिकारक शक्ती कमी आहे त्यांना दरवर्षी लस घ्यावी लागते. कोरोना देखील श्वसन प्रणालीवर हल्ला करतो. जर कोरोना विषाणू देखील फ्लू किंवा इंफ्लूएन्झा सारखा वागला तर हे टाळण्यासाठी दरवर्षी लस घ्यावी लागेल.