COVID-19 : दिलासादायक ! ‘कोरोना’ची वॅक्सीन COVAXIN चा प्री-क्लिनिकल ‘स्टडी’ पूर्ण, आता ह्यूमन ट्रायलला होणार सुरूवात

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –   कोरोनाची वॅक्सीन कोवॅक्सीन 15 ऑगस्टला लाँच होऊ शकते. फार्मास्यूटिकल कंपनी भारत बायोटेक आणि भारतीय उपचार संशोधन परिषद म्हणजेच आयसीएमआरकडून या वॅक्सीनच्या लाँचिंगची शक्यता आहे. वॅक्सीनबाबत आयसीएमआरने शनिवारी एक वक्तव्य जारी केले आहे. यात म्हटले आहे की, प्री-क्लिनिकल स्टडी यशस्वीरित्या पूर्ण झाला आहे, आता ह्यूमन ट्रायलच्या फेज 1 आणि 2 ची सुरूवात होणार आहे.

आयसीएमआरने म्हटले की, सार्वजनिक आरोग्य हितासाठी हे महत्वपूर्ण आहे की, एक स्वदेशी वॅक्सीनच्या परीक्षणात वेग आणला जावा. वॅक्सीनबाबत आयसीएमआरची प्रक्रिया जागतिकस्तरावरील स्वीकृत निकषानुसार योग्य आहे.

आयसीएमआरचे म्हणणे आहे की, आमचा उद्देश लवकरात लवकर वॅक्सीनचे सर्व टप्पे पूर्ण करणे आहे, जेणेकरून कोणत्याही उशीराशिवाय लोकसंख्या आधारित परीक्षणांना सुरूवात करता यावी. नुकतेच कोवॅक्सीनला ह्यूमन ट्रायलची परवानगी मिळाली आहे.

आयसीएमआरकडून जारी पत्रानुसार, 7 जुलैपासून ट्रायलसाठी इनरॉलमेंट सुरू होईल. यांनतर जर सर्व ट्रायल योग्य झाल्या तर आशा आहे की, 15 ऑगस्टपर्यंत कोवॅक्सीन लाँच करता येईल. सर्वप्रथम भारत बायोटेकची वॅक्सीन मार्केटमध्ये येऊ शकते.

मागच्या काही दिवसातच हैद्राबादची फार्मा कंपनी भारत बायोटेकने दावा केला होता की, त्यांना कोवॅक्सीनच्या फेज-1 आणि फेज-2 च्या ह्यूमन ट्रायलसाठी डीसीजीआयकडून हिरवा झेंडा मिळाला आहे. कंपनीने म्हटले की, ट्रायलचे काम जुलैच्या पहिल्या आठवड्यात सुरू करण्यात येईल. भारत बायोटेकला वॅक्सीन बनवण्याचा जुना अनुभव आहे.