देशात दररोज होणार 10 लाख ‘कोरोना’ चाचण्या, ICMR तयार करणार आराखडा

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : देशात कोरोना विषाणूच्या रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. दररोज हजारोच्या संख्येने कोरोना विषाणूची नवीन प्रकरणे समोर येत आहेत. आता देशात कोरोना विषाणूच्या रुग्णांची संख्या 14 लाखांच्यावर गेली आहे. या दरम्यान, आता आयसीएमआर कोरोना चाचणीची संख्या वाढविण्याच्या विचारात आहे. मिळालेल्या माहितीनुसार इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर) कोरोना विषाणूची चाचणी वाढविण्याच्या तयारीत आहे. आयसीएमआरने दररोज दहा लाख नमुने तपासण्याची योजना आखली असल्याचे समजते. सध्या कोरोना विषाणूचे दररोज सुमारे पाच लाख नमुने तपासले जात आहेत.

देशात दररोज कोट्यवधी नमुने चाचण्या घेतल्या जातात. आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांच्या म्हणण्यानुसार देशात आतापर्यंत एकूण 1,62,91,331 कोरोना चाचण्या घेण्यात आल्या आहेत. 25 जुलै रोजी 4,42,263 चाचण्या घेण्यात आल्या. या व्यतिरिक्त चाचणी प्रयोगशाळेची संख्या वाढून 1307 झाली आहे. त्यामध्ये 905 शासकीय लॅब आहेत, तर 402 खासगी लॅब आहेत.

पंतप्रधान मोदी करणार लॅबचे उद्घाटन
पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबई, कोलकाता आणि नोएडा येथे तीन नवीन कोरोना विषाणू चाचणी प्रयोगशाळांचे उद्घाटन करणार आहेत. सर्व तिन्ही प्रयोगशाळेत दररोज 10,200 नमुने तपासले जाऊ शकतात. या प्रयोगशाळांमध्ये चाचणीची कार्यक्षमता वाढविण्यासाठी मोठ्या प्रमाणात चाचण्या केल्या जाऊ शकतात. दरम्यान, 27 जुलै रोजी पीएम मोदी हाय थ्रूपुट, कोविड -19 चाचणी सुविधा सुरू करणार आहेत.