‘कोरोना’ची लस तयार करण्याचे काम युद्ध पातळीवर, आरोग्य मंत्रालयाची माहिती

नवी दिल्ली – कोरोना विषाणूची जगभरात जागतिक महामारी झाली असून यावर व्हॅक्सीन तयार करण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. भारतातही दोन कंपन्यांनी कोरोना विषाणूची व्हॅक्सीन तयार केली आहे. या व्हॅक्सीनचे प्राण्यांवरील परीक्षणही पूर्ण झाले आहे, असे गुरुवारी आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे. मात्र, अद्याप या व्हॅक्सीनचे मानवावरील परीक्षण शिल्लक आहे. या व्हॅक्सीनचे मानवावरील परीक्षणही लवकरच सुरू होईल, असे आरोग्य मंत्रालयाचे ओएसडी राजेश भूषण यांनी सांगितले आहे.

भारत बायोटेक आणि कॅडिला हेल्थकेयर यांनी कोरोना विषाणूवरील व्हॅक्सीन तयार केली आहे. या व्हॅक्सीनचे परीक्षण तीन टप्प्यांत होणार आहे, असे बोलले जाते. यासंदर्भात आयसीएमआरच्या वरिष्ठ वैज्ञानिक डॉ. निवेदिता गुप्ता यांना विचारले असता, त्या म्हणाल्या, पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यावरील कोरोना व्हॅक्सीनच्या परिणामांवर तिसऱ्या टप्प्यावरील परीक्षण अवलंबून असते. याचवेळी, व्हॅक्सीन परीक्षणाचा तिसरा टप्पा फेटाळला जाऊ शकत नाही, मात्र, हे पहिल्या दोन टप्प्यांवर अवलंबून असेल.

आरोग्य मंत्रालयाचे ओएसडी राजेश भूषण यांनी सांगितले कि, ‘दोन्ही व्हॅक्सीनचे अ‍ॅनिमल टॉक्सिसिटीज परीक्षण पूर्ण झाले आहे. हे परीक्षण उंदीर, गिनीपिग, ससा यांच्यावर होतो. या दोन्ही परीक्षणाचा डेटा ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाला (डीसीजीआय) सादर केला आहे. यानंतरच दोघांनाही फेज-वनच्या क्लिनिकल परीक्षणाची परवानगी दिली आहे. तसेच, फेज-1 आणि फेज-2 मधील परीक्षण कोठे होणार?, हेही निश्चित केले आहे.’

भारत बायोटेक आणि इंडियन काउंसिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR)च्या Covaxin ला फेज-1 आणि फेज-2च्या परीक्षणासाठी ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाच्या वतीने मंजुरी मिळालीय. व्हॅक्सीन ट्रायलच्या पहिल्या टप्प्यात 375 लोकांवर परीक्षण केले जाईल. तर दुसऱ्या टप्प्यात 750 लोकांवर व्हॅक्सीनचे परीक्षण केले जाईल. कंपनीने फायनल एनरोलमेन्टसाठी 13 जुलै तारीख निश्चित केली आहे. Zydus Cadila च्या व्हॅक्‍सीनलाही ह्यूमन (मनुष्य) क्लिनिकल परीक्षणाची परवानगी मिळाली आहे.