ICMR चा Sero-Survey अहवाल : कंन्टेन्मेंट झोनमधील 30 % ‘कोरोना’बाधित रुग्ण आपोआप ‘कोरोनामुक्त’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशात कोरोना बाधित रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोनावर अद्याप कोणतेच औषध उपलब्ध झाले नसून कोरोनावर लस शोधण्याचा प्रयत्न जगभरातील अनेक देशातील शास्त्रज्ञ करीत आहेत. दरम्यान आयसीएमआर म्हणजेच इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चद्वारे करण्यात आलेल्या एका सामुदायिक नॅशनल सीरो सर्व्हे मधून एक माहिती समोर आली आहे. देशात कंटेन्मेंट झोनमधील 15 ते 30 टक्के लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला असल्याचे सांगण्यात आले आहे. एवढचं नाहीतर या व्यक्ती आपोआप कोणत्याही उपचारांशिवाय बरे झाल्याचे समोर आले आहे. एका इंग्रजी वृत्तपत्रामध्ये प्रसिद्ध करण्यात आलेल्या अहवालावरून ही माहिती देण्यात आली आहे.

देशात झपाट्याने वाढणाऱ्या कोरोनाच्या प्रादुर्भावामध्ये आयसीएमआर ने केलेला हा खुलासा अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. आयसीएमआरच्या रिपोर्टमध्ये मुंबई, पुणे, दिल्ली, अहमदाबाद, कोलकत्ता, चेन्नई, सुरत, जयपूर, आणि इंदोर या सारख्या शहरांच्या हॉटस्पॉट आणि कंटेन्मेंट झोनमधून मिळणाऱ्या आकड्यांच्या हवाल्याने हा निष्कर्ष काढण्यात आला आहे.

आयसीएमआरने दिलेल्या माहितीनुसार, या ठिकाणी कोरोनाच्या संसर्गाचा दर हा अत्यंत जास्त आहे. येथे इतर हॉटस्पॉटच्या तुलनेत 100 पटीने जास्त संसर्ग झाल्याचे निदर्शनास आलं आहे. हा आयसीएमआर द्वारे करण्यात आलेला पहिला नॅशनल वाईड सीरो सर्व्हे आहे. या सर्व्हेच्या प्राथमिक निष्कर्षांच्या आधारावर हा दावा करण्यात आला आहे. हा अहवाल युनियन कॅबिनेट सेक्रेटरी आणि पीएमओलाही पाठवण्यात आला आहे. या अहवालात सांगण्यात आले आहे की, हा सर्वे सरुग्णांकडून घेण्यात आलेल्या रक्तांच्या नमुन्यांमध्ये SARS CoV-2 च्या विरोधात तयार होणाऱ्या IgG अ‍ॅन्टीबॉडिजचा शोध घेण्यासाठी करण्यात आला होता.

IgG अ‍ॅन्टीबॉडिज रुग्णांच्या शरीरात कोरोना व्हायरशी लढवण्यासाठी तयार होतात. हे शरीरामध्ये संसर्ग झाल्यानंतर 14 दिवसांनी दिसतात आणि संसर्ग संपल्यानंतरही अनेक महिन्यांपर्यंत रुग्णाच्या सीरममध्ये राहतात. हा सीरो सर्व्हे नॅशनल सेंटर फॉर कंट्रोल, डब्ल्यूएचओ इंडिया आणि राज्य सरकारच्या सहकार्याने पूर्ण करण्यात आला आहे. यामध्ये देशाच्या 70 जिल्ह्यांमधून जवळपास 24 हजार नमूने घेण्यात आले होते.