भारत करणार ‘कोरोना’वर मात ! 1500 रुग्णांवर WHO करणार ‘या’ 3 औषधांची ‘ट्रायल’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोना व्हायरसं जगभरात थैमान घातले आहे. या व्हायरसमुळे आतापर्यंत 2.97 लाख लोकांचा मृत्यू झाला आहे. तर 43.45 लाख लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. 4 महिन्यापासून 100 हून अधिक देश कोरोनावर लस शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, अद्याप कोणालाही यश आलेले नाही. याशिवाय औषधांवरही युद्धपातळीवर काम सुरु आहे. या सगळ्यात जागतिक आरोग्य संघटनेनं काही औषधांची ट्रायल करण्यास सुरुवात केली आहे. यातून हे औषध कितपत उपयोगी आहे हे सिद्ध केले जाणार आहे.

आता भारतासाठी एक चांगली बातमी समोर आली आहे. एका इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार, जागतिक आरोग्य संघटना भारतातील 1500 कोरोना रुग्णांवर ट्रायल घेणार आहे. यामध्ये जगभरातील 100 देशांच्या रुग्णांचा समावेश आहे. इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चनं (ICMR) ट्रायलसाठी रुग्णांची निवड करण्यास सुरुवात केली आहे. आतापर्यंत देशातील नऊ रुग्णांची निवड करण्यात आली आहे.

WHO करणार या औषधांचं ट्रायल
ट्रायल दरम्यान रुग्णांना अँटी-व्हायरल औषधं दिली जातील. यात रेमेडीसवीर, क्लोरोक्विन/हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन, लोपीनावीर-रीटोनाविर या औषधांचा समावेश असणार आहे. चाचणी दरम्यान, यापैकी कोणत्याही औषधाचा कोरोनाच्या रुग्णावर परिणाम होत आहे की नाही याची तपासणी केली जाणार आहे. सध्या ज्या रुग्णालयातील रुग्णांची निवड करण्यात आली आहे. ती जोधपूरमधील एम्स, चेन्नईमधील अपोलो हॉस्पिटल, अहमदाबाद बीजे मेडिकल कॉलेज आणि सिव्हिल हॉस्पिटल तसेच भोपळमधील चिरायू मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमधील आहेत.

ज्या ठिकाणी जास्त रुग्ण तिथे चाचणी साइट्स
ICMR – नॅशनल एड्स रिसर्च इन्स्टिट्यूटच्या (NARI) डॉक्टर शीला गोडबोले यांनी याबाबत माहिती देताना, सध्या आम्ही आकडेवारीचे पालन करीत आहोत, त्यामुळे ज्या ठिकाणी रुग्ण जास्त आहेत, तेथे चाचणी साइट्स असतील. यापूर्वी 9 रुग्णालयांना परवानगी देण्यात आली असून लवकरच आणखी 4 रुग्णालयांना ग्रीन सिग्नल देण्यात येईल. यामध्ये रुग्णांच्या संख्येवर कोणतेही बंधन नाही.