कोरोनाचे भय : ICSE ने रद्द केल्या 10वी बोर्ड परीक्षा, 12वीची परीक्षेबाबत दिले ‘हे’ निर्देश

नवी दिल्ली : वृत्त संस्था – देशातील वाढता कोरोना संसर्ग पाहता आयसीएसईने इयत्ता दहावीच्या बोर्ड परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. तर इयत्ता बारावीची बोर्ड परीक्षा काही काळासाठी स्थगित करण्यात आली आहे. एक जूनला स्थितीचे अवलोकन केल्यानंतर बारावी बोर्ड परीक्षेच्या नवीन तारखेची घोषणा केली जाईल.

सीआयएससीईने आपल्या अधिकृत वेबसाइटवर याबाबतची अधिसूचना जारी केली आहे. अधिसूचनेत लिहिले आहे की, देशात कोविड-19 महामारीची सध्याची स्थिती पाहता, सीआयएससीईने आयसीएसई (इयत्ता दहावी ) 2021 परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. दिनांक 16 एप्रिल 2021 ला जारी सक्युर्लर रद्द केले जात आहे. आमची प्राथमिकता विद्यार्थी आणि शिक्षकांची सुरक्षा आहे.

मागील 24 तासात समोर आले 2.59 लाख नवे रूग्ण
देशात मंगळवारी कोरोना संसर्गाचे 2.59 लाख रूग्ण सापडले आहेत. तर 1,761 संक्रमितांचा मृत्यू झाला आहे. यासोबतच आता देशात एकुण प्रकरणांची संख्या 1,53,21,089 झाली आहे. ज्यामध्ये आतापर्यंत 1,31,08,582 रूग्ण बरे झाले आहेत, 1,80,530 लोकांचा मृत्यू झाला आहे आणि 20,31,977 सक्रिय रूग्ण आहेत.