नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सार्वजनिक क्षेत्रातून खाजगी क्षेत्रात प्रवेश केलेल्या आयडीबीआय बँकेने (IDBI Bank) आपल्या ग्राहकांसाठी एक नवीन योजना आणली आहे. आता घरबसल्या बचत खाते उघडण्यासाठी आणि सक्रिय करण्यासाठी मोबाइल आणि वेब आधारित नवीन सेवा आयडीबीआयने सुरू केली आहे. या सुविधेच्या सहाय्याने ग्राहक आधार ई-केवायसी (आधार ई-केवायसी) किंवा क्यूआर कोड पद्धतीद्वारे ग्राहक आपले खाते उघडू शकतो आणि सक्रियही करू शकतो.
ग्राहकांना मिळतील ‘या’ सुविधा –
मोबाइल आणि वेब आधारित या नवीन सुविधेमुळे ग्राहकांची कागदी कामातून मुक्तता होईल व ऑनलाईन कामे करता येतील.
या योजनेद्वारे बँक खाते काही मिनिटांचं सक्रिय होईल त्यामुळे ग्राहकांना अधिक चांगली सेवा मिळेल. मोबाइल आणि वेबच्या माध्यमातून जो ग्राहक खाते उघडेल त्याला आयडीबीआयच्या कोणत्याही शाखेतून चेकबुक आणि डेबिट कार्ड मिळू शकेल.
आयडीबीआय बनली आता खाजगी बँक –
वाढत्या एनपीएमुळे आयडीबीआय बँक संकटात सापडली होती. भारतीय आयुर्विमा महामंडळाकडून (LIC) या बँकेतील ५१ टक्के भागीदारी खरेदी करण्यात आली. त्यानंतर २१ जानेवारी २०१९ पासून आयडीबीआय खाजगी बँकेचा दर्जा देण्यात आला आहे. एलआयसीने या बँकेचं नाव बदलण्याची शिफारस केली होती मात्र रिझर्व्ह बँकेने त्याला नकार दिला. याआधी रिझर्व्ह बँकेने आयडीबीआयला तत्काळ सुधारणांच्या श्रेणीमध्ये ठेवले होते. आता आयडीबीआयमध्ये बँकिंग आणि विमा दोन्ही सेवा ग्राहकांना मिळणार आहेत. तसेच बँकेचे सध्याचे व्याजदर बँकिंग सेवांमध्ये कोणतेही बदल होणार नसल्याचे बँकेच्या तज्ज्ञांतर्फे सांगण्यात आले आहे.