‘या’ मोठ्या बँकेनं बदलले ATM मधून पैसे काढण्याचे नियम, 1 डिसेंबर पासून लागणार ‘शुल्क’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – खासगी क्षेत्रातील बँक आयडीबीआय (IDBI) बँकेने एटीएम व्यवहारासंदर्भातील नियमांमध्ये काही बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात आयडीबीआय बँकेने ग्राहकांना एसएमएसद्वारे माहिती दिली आहे. आयडीबीआय व्यतिरिक्त इतर एटीएममधून पैसे काढले आणि कमी शिल्लक असताना हा व्यवहार अयशस्वी झाला तर ग्राहकांना त्यासाठी प्रत्येक व्यवहारासाठी 20 रुपये शुल्क (फायनान्शिअल चार्ज ) द्यावे लागेल. एटीएम व्यवहाराचा हा नवा नियम 1 डिसेंबर 2019 पासून लागू करण्यात येणार असल्याची माहिती बँकेने दिली आहे.

इतर बँकांमध्ये मर्यादेपेक्षा अधिक व्यवहारांवर शुल्क आकारले जाते –

बहुतेक खाजगी आणि सार्वजनिक क्षेत्रातील बँका एटीएम व्यवहार विनामूल्य उपलब्ध करतात. मात्र त्यातील ठराविक लिमिट संपल्यानंतर ग्राहकांना शुल्क द्यावे लागते. आयडीबीआय बँक आपल्या एटीएमवर अमर्यादित एटीएम व्यवहार देते, परंतु इतर बँकांच्या एटीएममध्ये ही मर्यादा एका महिन्यात जास्तीत जास्त 5 व्यवहारांपर्यंत असते. या मर्यादेपेक्षा जास्त व्यवहार करण्यासाठी प्रत्येक व्यवहारासाठी 20 रुपये फायनान्शिअल चार्ज द्यावे लागते. नॉन-फायनान्शिअल चार्ज प्रति व्यवहारासाठी 8 रुपये आहे.

आयडीबीआय बँकेव्यतिरिक्त इतर बँका अन्य बँकांच्या एटीएम व्यवहारांवरही शुल्क आकारतात. बँक ऑफ बडोदा फायनान्शिअल चार्ज म्हणून 20 रुपये आणि नॉन-फायनान्शिअल चार्ज म्हणून 8 रुपये आकारते. कोटक महिंद्रा बँक 20 रुपये फायनान्शिअल चार्ज आणि जीएसटी तसेच नॉन-फायनान्शिअल चार्ज म्हणून 8.50 घेते.

पंजाब नॅशनल बँकेतही एका महिन्यात इतर बँकांकडून जास्तीत जास्त 5 एटीएम व्यवहारांची मर्यादा आहे. इतर बँकांच्या एटीएमच्या मर्यादेपेक्षा जास्त व्यवहार करण्यासाठी पीएनबी फायनान्शिअल चार्ज आणि नॉन-फायनान्शिअल चार्ज म्हणून 20-20 रुपये घेते. कॅनरा बँकेकडे 20 रुपये फायनान्शिअल चार्ज आणि आणि जीएसटी तसेच नॉन-फायनान्शिअल चार्ज म्हणून 10 घेते.

Visit : Policenama.com