एका लग्नाची ‘लै भारी’ गोष्ट ; तरुणाईसमोर ठेवला ‘हा’ नवा आदर्श

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – डेस्टिनेशन वेडिंग , थीम वेडिंग, अशा खर्चिक लग्नांचे फॅड सध्या तरुणाईमध्ये आहे. एवढेच काय प्री वेडींग फोटो शूट करिता देखील लाखो रुपये खर्च केले जातात. पण अशा गोष्टींना फाटा देत पुण्यातील एका जोडप्याने मात्र अवघ्या १५० रुपयात लग्न करून आजच्या तरुणाईपुढे एक नवीन आदर्श निर्माण केला आहे. जगदीश आणि छाया ओहोळ असे या नवदाम्पत्याचे नाव आहे.

लग्नाची भेट म्हणून संविधानाची प्रत
हा अनोखा विवाह सोहळा पुण्याच्या विवाह नोंदणी कार्यालयात पार पडला. या लग्नाची आणखी एक विशेष बाब म्हणजे या लग्नाकरिता थोड्या लोकांनाच आमंत्रण देण्यात आले होते. लग्नातील नातेवाईक आणि आप्तेष्टांना भेट म्हणून संविधानाची प्रत देण्यात आली तसेच रोपांचे वाटप करण्यात आले. विवाहाच्या दिवसाचे औचित्य साधत त्यांनी अवयवदानाचा फॉर्मही भरला आहे.

परिवर्तनाची सुरुवात स्वतःपासून
याबाबत एका मराठी वृत्तपत्राशी बोलताना जगदीश म्हणाले की, ‘महाराष्ट्रात एवढा प्रखर दुष्काळ असून ही ऐपत नसताना कर्ज काढून लाखोंचा खर्च करून, बँड, बाजा, बारात, रोषणाई, डीजे लावून केलेले विवाह सर्रास पहायला मिळतात. अनेक प्रबोधनकारांनी ‘विवाह साध्या पद्धतीने करा’ असे सांगूनही समाजपरिवर्तन होताना दिसत नाही. या परिवर्तनाची सुरुवात स्वतः पासून करायची अशी खूणगाठ मनाशी बांधून आम्ही लग्न केले आहे. यातून एका जरी जोडप्याने आदर्श घेतला तरी आम्हाला त्याचे समाधान असेल.