खोदकामादरम्यान सापडलेल्या कुबेर मूर्ती शेजारी नाग

परळी वैजनाथ : पोलीसनामा ऑनलाइन
परळी अंबाजोगाई रस्त्यावर कन्हेरवाडीच्या अलीकडे असलेल्या एका डोंगराचे खोदकाम सुरु असताना एक पुरातन मुर्ती सापडली आहे. त्या मुर्तीच्या भोवती एक भला मोठा नाग वेटाळे घालून बसल्याचे खोदकाम करणाऱ्याला दिसले. बघता-बघता ही गोष्ट सगळीकडे पसरली आणि बघ्यांची गर्दी जमली.

परळीपासून जवळच असलेल्या कन्हेरवाडीच्या अलिकडील डोंगराचे जेसीबीच्या साहाय्याने खोदकाम करून त्यातून निघालेली माती, दगड, मुरुम परळी ते अंबाजोगाई केंद्रीय राष्ट्रीय महामार्गाचे काम चालू आहे. त्या कामासाठी या मुरुम व मातीचा वापर होतो. आज जेसीबीने डोंगर माथ्यापासून ते जमीनी पर्यंतच्या 25 फुट खाली अंतरावर सोमवारी सकाळी दहा वाजता प्राचीन मुर्ती आढळली. त्या मुर्तीच्या पाठोपाठ अचानक एक भला मोठा नाग मुर्ती जवळ वेटाळे घालून बसला. जेसीबी चालकाने पुन्हा डोंगर खोदण्याचा प्रयत्न केला असता. त्या भल्या मोठ्या नागाने आपला फणा वर काढून जोराचे फुत्कार सोडले. हे दृश्य पाहून जेसीबी चालकाने जेसीबी मागे घेऊन पळ काढला व जेसीबी गेल्यानंतर तो नाग मुर्तीला वेटोळे घालून बसला. बघता बघता ही बातमी सर्वत्र पसरताच तेथे बघ्यांची गर्दी उसळली. या ठिकाणी परळीचे तहसीलदार शारद झाडके, नायब तहसीलदार सदानंद बरदाळे, मेजर गर्जे यांनी भेट दिली.