प्रसिध्द लेखक आणि इतिहासतज्ञ रामचंद्र गुहा म्हणतात – ‘मोदींनंतर आदित्यनाथ पंतप्रधान झाले तर…’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – प्रसिद्ध लेखक आणि इतिहासकार रामचंद्र गुहा यांनी आपलं मत मांडलं आहे. ते म्हणतात देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यानंतर आता उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे देशाचे पंतप्रधान असण्याची त्यांनी दाट शक्यता वर्तवली आहे. गुहा यांनी एका आर्टिकल मध्ये योगी आदित्यनाथ हे देशाचे पंतप्रधान झाले तर काय होईल असं मत त्यांनी व्यक्त केलं आहे. मोदी आणि योगी यांच्यातला फरक त्यांनी मांडताना नरेंद्र मोदींपेक्षा योगी यांची कामगिरी भारतातील सामाजिक एकता बिघडवण्याचं काम करेल असं मत त्यांनी मांडलं आहे.

लेखक रामचंद्र गुहा यांनी भरारी घेण्यास तयार असणारा पक्षी (Waiting in the wings) हा एक लेख लिहिला आहे. या लेखामध्ये त्यांनी आपला मत व्यक्त केलं आहे. यामध्ये त्यांनी योगी आदित्यनाथ हे पंतप्रधान झाल्यास देशातील धार्मिक एकताही धोक्यात येईल असे सांगितले आहे. तसेच २०१९ मध्ये मोदीच्या जवळचे असणारे गृहमंत्री अमित शहा हे पंतप्रधान पद सांभाळतील असं सर्वानाच वाटलं होतं. पण २०२० पर्यंत अधिक जोराने पुढे येणारे हे योगी आहेत. त्यांनी राज्यात धार्मिक मुद्द्यांसंदर्भातील नवीन कायदे केले आहेत. अशामुळे योगीचं नेतृत्व कर्नाटक आणि मध्यप्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी मान्य केलं आहे. तसेच राजकारणात टिकून राहायचं असेल तर योगीसारखं राजकारण करणं महत्वाचे आहे असं अनेक नेत्यांना वाटत आहे. असंही त्यांनी सांगितलं आहे.

या लेखामध्ये मोदी आणि योगी यांच्यामधील फरक आणि साम्य साम्य सांगितलं आहे. दोन्ही नेते हे एकाधिकारशाहीच्या मार्गाने काम करण्यासाठी ओळखले जातात, यांनी विरोधकांना संपवण्यासाठी पोलीस यंत्रणा आणि सरकारी यंत्रणांचा वापर केल्याचे पुरावे सापडत असल्याचं सांगत आहेत. तर मोदी किमान सबका साथ सबका विकास असं म्हणतात, मेट्रोत एखाद्या मुस्लिमाबरोबर फोटो तरी काढतात. परंतु योगी हे असलं करत नाही. मोदींनी २०१४ च्या दरम्यान गुजरात मॉडेलच्या नावाखाली सत्ता मिळवली. मात्र योगी यांनी राज्यात काम सुरु केलं आहे. हे काम धार्मिकदृष्ट्या, धर्माला विरोध करत राजकारण करण्याचं आहे असं म्हटलं आहे. तसेच हिंदू हे इतर कोणत्याही धर्मावर श्रद्धा असणाऱ्या आणि खासतर मुस्लीमांपेक्षा वरचढ आहेत असं योगी समजतात. एखादी हिंदुत्वावादी संघटना स्थापन करुन मुख्यमंत्री पदापर्यंत पोहचलेले योगी एकमेव नेते असल्याचं गुहा सांगतात.

पुढे त्या लेखात म्हटले आहे की, मोदी जेव्हा गुजरातचे मुख्यमंत्री होते तेव्हा राज्यात अनेक कंपन्या आल्या होत्या आणि उद्योगवाढीचं वातावरण होतं. परंतु योगींच्या काळात अस काही नव्हतं कारण देशातील सर्वाधिक लोकसंख्या असणारं त्यांचं राज्य आर्थिक, सामाजिक दृष्ट्या मागसलेलं आहे. हीच राज्याची प्रतिमा चांगली करण्याचं काम योगींनी गेल्या काही वर्षात केला आहे असं त्यांनी टीका करत म्हटलं आहे. तसेच योगी हे आगामी निवडणुकांत प्रचाराची धुरा सांभाळले तरी ते आणि भाजपा आता देशातील लोकांना कोणत्या ‘अच्छे दिन’ची स्वप्न दाखवणार? असे त्यांनी म्हटले आहे.

योगी आदित्यनाथ पंतप्रधान झाले तर ?
योगी अदित्यनाथ पंतप्रधान झालेत तर जगातील इतर देश आपल्या देशाबद्दल काय विचार करतील याबद्दल त्यांना फारशी चिंता नसेल. देशामध्ये आपण अधिक शक्तीशाली होणं हेच त्यांचं एकमेव ध्येय असणार. खासतर राजकीय, वैचारिक आणि धार्मिक मतांशी आपल्याशी सहमत नसणाऱ्यां विरोधात शक्तीप्रदर्शन करण्याचा त्यांचा विचार असेल. मात्र पंतप्रधान मोदींनी जगभरातील अनेक देशांमध्ये दौरे करुन तेथील नेत्यांना भारताकडे आकर्षित केले आहे. यात त्यांना संमिश्र यश मिळालं. असं गुहा म्हणतात.

मोदी, योगी आणि इंदिरा गांधीची तुलना –
रामचंद्र गुहा यांनी या तिघांची तुलना करताना त्यांच्या लेखाच्या अखेर म्हटलं आहे की, काही महिन्यांपूर्वी मी माझ्या एका लेखामध्ये आताच्या आणि माजी पंतप्रधानांच्या कामासंदर्भात बोलताना सत्ता केंद्रीकरण आणि नियंत्रण यासंदर्भात नरेंद्र मोदी हे स्टेरॉइड घेतलेल्या इंदिरा गांधी आहेत असं म्हटलं होतं. तर आता योगी पंतप्रधान झाल्यावर ते स्टेरॉइड घेतलेले मोदी ठरतील, असा टोला त्यांनी लगावला आहे. मागील वर्षामध्ये गुजरात मॉडेलमुळे देशातील सामाजिक आणि संस्थात्मक स्वातंत्र्य जपणाऱ्या गोष्टींवर नकारात्मक पद्धतीचा दिर्घकालीन परिणाम झाला आहे. परंतु युपी मॉडेल आल्यास हे पूर्णपणे उद्धवस्त होऊन जाईल,अशी भीती प्रसिद्ध लेखक आणि इतिहासकार रामचंद्र गुहा यांनी व्यक्त केली आहे.