अमित शहांना ‘गृह’खातं दिलं तर ‘हा’ प्रश्न कायमचा निकाली लागेल : शिवसेना

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन – लोकसभा निवडणुकीतील घवघवीत यशानंतर काल मोदी सरकारचा शपथविधी पार पडला. त्यानांतर आता कुणाला कोणते मंत्रिपद मिळणार याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. त्यामुळे सगळेच जण आपल्याला वजनदार खाते मिळण्याची अपेक्षा करत आहेत. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीनंतर उद्धव ठाकरे यांनी अमित शहांचा उल्लेख ‘अफजलखान’ असा केला होता. त्यामुळे दोन्ही नेत्यांमध्ये वितुष्ट आले होते. मात्र २०१९ च्या निवडणुकीआधीच दोन्ही नेत्यांनी समेट घडवून आणत एकत्र निवडणुका लढवल्या.

त्यानंतर काल शपथविधी पार पडल्यानंतर आज सामनाच्या अग्रलेखातून अमित शहांवर स्तुतीसुमने उधळण्यात आली आहेत. मोदी सरकार -२ चा चेहरा मोदी हाच आहे. त्यांच्या मंत्रिमंडळातील मोहरे काय करतात ते पाहायचे. नाहीतर अमित शहा यांचा चाबूक तेथे आहेच, असे या अग्रलेखात म्हणण्यात आले आहे. त्याचप्रमाणे शहांना अर्थ, गृह किंवा सरंक्षण यापैकी एक खातं देण्यात यावं असंदेखील या अग्रलेखात लिहिण्यात आले आहे. शहा यांनी संरक्षण खाते स्वीकारले तर पाकिस्तानचा प्रश्न कायमचा निकाली लागेल असा लोकांचा विश्वास आहे. त्यांनी गृह खाते स्वीकारले तर अयोध्येत राममंदिर सहज उभे राहील. त्याचप्रमाणे कश्मीरात ३७० कलम हटविण्याची घोषणा त्यांनी केली आहे, त्या कार्यास गती मिळेल. तेही या अग्रलेखात सांगण्यात आले आहे.

दरम्यान, शहा हे जर अर्थमंत्री झाले तर विकासकामे मोठ्या प्रमाणावर सुरु होतील. विकासाला मोठ्या प्रमाणावर गती मिळेल’ असेदेखील या अग्रलेखात लिहिण्यात आले आहे. शेतकरी व कष्टकऱ्यांना लाभ मिळतील. त्याचबरोबर सर्वात महत्वाचे म्हणजे शहा यांच्या समावेशाने मोदी मंत्रिमंडळाची ताकद वाढेल, असेदेखील या अग्रलेखात लिहिण्यात आले आहे. त्यामुळे आता पंतप्रधान मोदी शिवसेनेचे ऐकून खरंच शहा यांना या तीनपैकी एखादं खातं देतात कि कोणते वेगळे हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.