WhatsApp ग्रुपवर ‘आक्षेपार्ह’ पोस्ट आढळल्यास ‘ॲडमिन’वर FIR दाखल होणार

वाघोली : पोलीसनामा ऑनलाइन (कल्याण साबळे पाटील) – एक जानेवारीच्या शौर्य दिनानिमित्ताने आपल्या मोबाईल ग्रुपवर कुठल्याही प्रकारची आक्षेपार्ह पोस्ट आली आणि ती पोलिसांच्या निदर्शनास आली तर अशा प्रत्येक मोबाईल ग्रुप ॲडमिनवर गुन्हा दाखल होणार आहे. पुणे जिल्ह्यातील शिक्रापूर व लोणीकंद पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एकूण 250 मोबाईल ग्रुपॲडमिनला लेखी नोटिसा दोन्ही पोलीस स्टेशनच्या पोलिसांकडून देण्यात आल्या आहेत.

मोबाईल ग्रूप ॲडमिनला या नोटिसा गुन्हा बाबतीत न्यायालयात पुरावा म्हणून वापरण्यात येणार आहेत. यात ग्रुपॲडमिन दोषी असल्यास थेट तीन वर्षांच्या तुरुंगवासाच्या शिक्षेपर्यंत नेण्याची पूर्ण तयारी जिल्हा पोलिसांनी केली आहे. यावर्षीच्या कोरेगाव भीमा येथील 1 जानेवारी विजयस्तंभ अभिवादन दिनाच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्हा पोलिस सतर्क झाले असून शिक्रापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत 280 जणांवर तर लोणीकंद पोलिस स्टेशनच्या हद्दीमध्ये एकूण 230 जणांवर प्रतिबंधात्मक कारवाईबरोबरच पोलिसांची आता सोशल मीडियाकडे अतिशय बारीक नजर असणार आहे.

याच पार्श्वभूमीवर इन्स्टाग्राम, टिकटॉक, हेलो ॲप आदींसह फेसबुक-व्हॉट्‌सॲपच्या राज्यातील सर्व सोशल मीडिया ग्रुपवर राज्यातील पोलिसांचे लक्ष केंद्रित करण्यात आले असून शिक्रापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील 150 ग्रुप व लोणीकंद पोलिस ठाण्याच्या हद्दीतील 100 ग्रुप ॲडमिनला वैयक्तिकरीत्या नोटिसा बजावण्यात आल्याची माहिती हवेलीच्या उपविभागीय अधिकारी भोरे पाटील, लोणीकंद चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रताप मानकर, साहायक पोलिस निरीक्षक मयूर वैरागकर व शिवशांत खोसे यांनी दिली.

नोटिशीनुसार, हद्दीतील कुठल्याही व्हॉट्‌सॲप ग्रुपॲडमिनसह ग्रुपमेंबरपैकी कुणीही समाजविघातक, ऐतिहासिक विपर्यासाची, सामाजिक भडकावू टीकाटिप्पणी पोस्ट केल्यास, मेसेजेस किंवा इमेज वा व्हिडिओ शेअर केल्यास सर्वप्रथक ग्रुपॲडमिनला अटक करून त्यावर आयटी ॲक्‍टनुसार गुन्हा दाखल करून कारवाई करण्यात येणार आहे. आत्ता दिलेली नोटीस ही पुरावा म्हणून न्यायालयात वापरून आरोपींना कमाल तीन वर्षांपर्यंत कोठडीच्या शिक्षेपर्यंत नेण्याची पूर्ण तयारी आम्ही केली आहे.
– (शिवशांत खोसे, साहायक पोलिस निरीक्षक, बंदोबस्त नियोजन विभागाचे प्रमुख)

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/