पालखी प्रस्थान सोहळ्यात बाहेरील नागरिक सहभागी झाल्यास FIR दाखल होणार

आळंदी/पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. कोरोना विषाणू राज्यातील कानाकोपऱ्यात पोहचला आहे. आता कोरोना विषाणूने आळंदी येथील माऊलींच्या महाद्वारात दस्तक दिली आहे. आळंदीत मृत 42 वर्षीय महिला कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे स्पष्ट झाले आहे. या महिलेचा कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे समाधी मंदिर परिसर कँटेन्मेंट झोन म्हणून घोषित करण्यात आला आहे.

पालखी प्रस्थान सोहळ्यात बाहेरील नागरिकांनी सहभाग घेतल्यास त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात येतील असा इशारा आता पोलिसांनी दिला आहे. सोहळ्याला आलेल्या बाहेरील नागरिकांना 14 दिवस क्वारंटाईन केलं जाईल, नागरिकांनी घरातच बसून पालखी सोहळ्याचे दर्शन घ्यावे, असे आवाहन पोलीस उपायुक्त स्मिता पाटील यांनी केले आहे.

संत ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रस्थान सोहळा अवघ्या दोन दिवसांवर आला आहे. 13 ते 30 जून या कालावधीत माऊलींच्या पादुका आजोळ घरातील वाड्यात विसावतील. दरम्यानच्या काळात बाहेरील कोणत्याही नागरिकास आळंदीमध्ये येण्यास मज्जाव करण्यात आला असल्याची माहिती प्रांतअधिकारी संजय तेली यांनी दिली आहे. मागील तीन महिन्यापासून कोरोनामुक्त असलेल्या आळंदीत आता कोरोनाचा रुग्ण सापडल्याने नागरिकांमध्ये भीती पसरली आहे.

मृत महिला ही समाधी मंदिर परिसरात रहात होती. त्यामुळे मंदिराच्या बाहेरील परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर माऊलींचा पालखी सोहळा मोठ्या पोलीस बंदोबस्तात पार पडणार आहे. नियम मोडून आळंदीत प्रवेश करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. दरम्यान कोरोना व्हायरसच्या साथीमुळे पहिल्यांदाच आषाढी वारीचा पालखी सोहळा रद्द करण्यात आला आहे. हजारो वर्षांची परंपरा असलेल्या पालखी सोहळा पहिल्यांदाच रद्द करण्यात आला आहे. मात्र, माऊली आणि इतर संतांच्या पादुका श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी नेण्यात येणार आहेत.