आजन्म बंदी माझ्यासाठी खूप कठोर शिक्षा : श्रीसंत

दिल्ली : वृत्तसंस्था – भारतीय क्रिकेट संघाचा माजी गोलंदाज श्रीसंत २०१३ च्या आयपीएल मॅच फिक्सिंग प्रकरणात दोषी आढळल्यानंतर बीसीसीआय ने त्याच्यावर आजन्म बंदीची शिक्षा लावली. या बाबत श्रीसंतने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. ही शिक्षा माझ्या साठी खूप कठोर आहे माझं वय सध्या ३५ असून माझी मैदानात खेळण्याची क्षमता हळूहळू कमी होत जाईल. त्यामुळे मला पुन्हा खेळण्याची संधी मिळाली पाहिजे. अशी मागणी त्याने केली आहे. सर्वोच्च न्यायालयाने ही सुनावणी पुढे ढकलली असून जानेवारीच्या तिसऱ्या आठवड्यात यावर सुनावणी होणार आहे.
ज्येष्ठ वकील सलमान खुर्शिद यांनी सर्वोच्च न्यायालयात श्रीसंतची बाजू मांडली. स्पॉट फिक्सिंग प्रकरणी ट्रायल कोर्टाने श्रीसंतला क्लीन चीट दिली असून त्याच्यावरील बंदी उठवून क्रिकेट खेळण्याची संधी दिली पाहिजे असं मत त्यांनी न्यायाधीश अशोक भूषण आणि अजय रस्तोगी यांच्या खंडपीठासमोर मांडलं. ज्या इतर खेळाडूंची नावं स्पॉट फिक्सिंग प्रकरणी समोर आली त्यांना तीन ते पाच वर्ष आणि श्रीसंतवर कायमची बंदी घालणं योग्य नाही. त्याच्यावर बंदी घातल्यामुळे त्याला स्थानिक क्लब क्रिकेटही खेळता येत नाही. तो ३५ वर्षाचा असून आजन्म बंदी  ही त्याच्या साठी खूप कठोर शिक्षा आहे.
पुढे बोलताना त्यांनी माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीन यांचं उदाहरण दिलं. मोहम्मद अझरुद्दीनला क्रिकेट प्रशासनावर पुन्हा येण्याची तसंच हैद्राबाद क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदाची निवडणूक लढवण्याची बीसीसीआयकडून परवानगी देण्यात आली होती अशी माहिती त्यांनी खंडपीठाला दिला.
प्रशासकीय समितीचे वकील पराग त्रिपाठी यांनी युक्तिवाद करताना क्रिकेटमध्ये  कोणत्याही भ्रष्टाचाराचे  प्रकरण सहन केले जाणार नाही इतर खेळाडूंपर्यंत हा संदेश जावा यासाठी कठीण शिक्षा देण्यात आली असल्याचं सांगितलं.
Loading...
You might also like