बिल भरलं नाही तर 15 तारखेला थेट वीज कापणार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – मुख्य कार्यालयाकडून शासकीय, निमशासकीय कार्यालयांसह सर्व वर्गवारीतील थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. दरमहा थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्याबाबत देण्यात येणाऱ्या यादीतील ग्राहकांची वीज महिन्याच्या १५ तारखेपर्यंत खंडित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

दरमहाच्या वसुलीचे लक्ष्य त्याच महिन्यात शंभर टक्के पूर्ण करण्यासोबतच थकबाकीदारांचा वीजपुरवठा तात्काळ खंडित करा, असे निर्देश कोकण विभागाचे प्रभारी प्रादेशिक संचालक अंकुश नाळे यांनी दिले आहेत.

महावितरणच्या कोकण प्रादेशिक विभागात दरमहा दिले जाणारे वीजबिल वसुलीचे उद्दिष्ट आणि प्रत्यक्ष वसुली यात खूप फरक आहे. कोकण विभागातील भांडुप, रत्नागिरी, कल्याण, जळगाव आणि नाशिक परिमंडळाचे मुख्य अभियंता याच्याशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंग घेतली. थकबाकीपोटी वीजपुरवठा खंडित केल्यानंतर पुन:जोडणी शुल्क भरल्याशिवाय वीजपुरवठा पूर्ववत केला जात नाही. त्यामुळे ग्राहकांनी थकबाकी आणि चालू वीजबिल भरावे आणि संभाव्य गैरसोय टाळावी, असे सांगण्यात आले आहे.