… तर राष्ट्रवादी पर्यायी सरकार स्थापन करेल, NCP च्या ‘या’ बड्या नेत्यानं सांगितलं

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात सत्तास्थापनेच्या हालचालींना प्रचंड वेग आला आहे. येत्या शुक्रवारी देवेंद्र फडणवीस हे पुन्हा एकदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतील असं सांगितलं जातंय. दरम्यान, विधिमंडळात भाजपकडून बहूमत सिध्द झालं नाही तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सरकार स्थापन करेल असं राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार नवाब मलिक यांनी सांगितलं आहे. चालु असलेल्या शिवसेना आणि भाजपमधील तिढयावरून ते बोलत होते.

विधानसभा निवडणुकीत 105 जागा मिळवत भाजपा सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आला आहे तर शिवसेनेला 56 जागा मिळाल्या आहेत. लोकसभा निवडणुकीच्या वेळी विधानसभा निवडणुकीनंतरचा फॉर्म्युला ठरला होता असं सांगत शिवसेनेकडून मुख्यमंत्री पद आणि सत्तेत 50-50 च्या सुत्रावरून वाटा मागितला आहे. त्यामुळे रणकंदन चालू आहे. राष्ट्रवादीच्या 54 जागा आहेत. भाजप-शिवसेनेत वाद चालु असल्याने काहीशा राष्ट्रवादीच्या सत्तास्थापनेच्या आशा देखील पल्लवीत झाल्या आहेत. विधानसभेत जर भाजपला बहुमत सिध्द करता आलं नाही तर राष्ट्रवादी काँग्रेस पर्यायी सरकार स्थापन करण्याचा विचार करेल असं नवाब मलिक यांनी सांगितलं आहे. एका खासगी वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी हा दावा केला आहे.

दरम्यान, आज मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षाची बैठक होणार असून त्यामध्ये विधिमंडळ पक्षाच्या नेत्याची निवड करण्यात येणार आहे. बैठकीस सर्व ज्येष्ठ नेते आणि आमदार उपस्थित राहणार आहेत.

Visit : Policenama.com