….तर भाजपा नव्हे ‘हे’ ठरवणार आगामी पंतप्रधान

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान पदाविषयी भाष्य केले आहे. २०१४ मधील निवडणुकीपेक्षा २०१९ मध्ये भाजपने १०० कमी जागा जिंकल्यास आगामी पंतप्रधान भाजप नव्हे तर राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) ठरवणार,असं वक्त्यव्य संजय राऊत यांनी एका मुलाखतीत केले आहे.

संजय राऊत यांना नितीन गडकरी आणि पंतप्रधानपद यासंदर्भात प्रश्न विचारला असता ते म्हणाले की, ‘मी पंतप्रधानपदासाठी नितीन गडकरी यांना पाठिंबा दिलेला नाही. फक्त नितीन गडकरीच का ? भाजपाकडे अनेक चेहरे आहेत. २०१४ मधील निवडणुकीपेक्षा ह्यावेळेस भाजपने १०० जागा कमी जिंकल्यास आगामी पंतप्रधान भाजप नव्हे तर राष्ट्रीय लोकशाही आघाडी ठरवणार. आम्ही भाजपासमोर अशी कोणतीही अट ठेवलेली नाही. प्रसारमाध्यम आणि संघाकडून अशा बातम्या पसरवल्या जातात. ‘

भाजप कधीही शिवसेनेची जागा घेऊ शकत नाही –
राज्यात भाजपा कधीही शिवसेनेची जागा घेऊ शकत नाही. विद्यमान भाजपा ही आधीसारखी भाजपा नाही. सध्याच्या भाजपामधील अर्ध्याहून अधिक नेते काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधून आले आहेत. त्यांना पक्षात घेतले म्हणजे शिवसेनेची जागा मिळवता येईल, असे होणार नाही. महत्त्वाचे म्हणजे तुम्ही शिवसेनेची जागा घ्यालही, पण शिवसेनेसारखी मर्दानी हिंमतीची छाती कुठून आणणार, असा सवालही राऊत यांनी भाजपाला विचारला आहे.

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना-भाजपची युती जाहीर झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजप अध्यक्ष अमित शाह आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत युतीची घोषणा केली. लोकसभेला भाजप २५ आणि शिवसेना २३ जागा लढवणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपावर अंतिम तोडगा काढण्यात आला असला, तरी विधानसभेचा फॉर्म्युला अंतिम करण्यात आलेला नाही.