….तर राज्यभर वैद्यकीय सेवा ठप्प पाडू; IMA व मॅग्मोचा इशारा

भंडारा : पोलिसनामा ऑनलाईन – जिल्हा सामान्य रुग्णालयातील अग्निकांडप्रकरणी शनिवारी पोलीस महासंचालक हेमंत नगराळे यांनी रुग्णालयाच्या पाहणीनंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांशी दोन तास बंदद्वार चर्चा केली. परिणामी संबंधितांवर गुन्हे दाखल होणार, अशी चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान वैद्यकीय अधिकारी यांच्यासह सात जणांवर प्रशासकीय कारवाईनंतर पोलीस कारवाई केल्यास राज्यव्यापी वैद्यकीय सेवा ठप्प पाडण्याचा निर्वाणीचा इशारा आयएमए व मॅग्मो संघटनांनी दिला आहे. वैद्यकीय अधिकारी व नर्सेस यांच्यामागे पोलीस कारवाईचा ससेमिरा सुरू असतानाच संघटनांनी ही आग्रही भूमिका घेतली आहे.

जिल्हा सामान्य रुग्णालयातील अग्निकांडाच्या उच्चस्तरीय चाैकशी समितीचा अहवाल गुरुवारी शासनाला सादर करण्यात आला. जिल्हा शल्य चिकित्सकांसह सात जणांवर कारवाई झाली आहे. दरम्यान, शनिवारी दुपारी ४ वाजता राज्याचे पाेलीस महासंचालक हेमंत नगराळे यांनी भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयाला भेट दिली.

एसएनसीयू कक्षासह रुग्णालयाच्या बाहेरील परिसराचे त्यांनी निरीक्षण केले. यावेळी त्यांच्यासाेबत जिल्हाधिकारी संदीप कदम, जिल्हा पाेलीस अधीक्षक वसंत जाधव, प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डाॅ. पीयूष जक्कल आदी उपस्थित हाेते. यानंतर पाेलीस महासंचालक थेट जिल्हा पाेलीस अधीक्षक कार्यालयात पाेहाेचले. तब्बल दाेन तास त्यांनी येथे अधिकाऱ्यांसाेबत चर्चा केली. या बैठकीत नेमके काय झाले याबाबत माहिती उपलब्ध हाेऊ शकली नाही.

दरम्यान, रविवारी कुणावरही गुन्हे दाखल करण्यात आले नाहीत. घटनेच्या १४ दिवसांनंतर राज्य शासनाने सात जणांवर कारवाई केली, तर न्यायवैद्यक चौकशीच्या अहवालानंतर पोलिसांची भूमिका ठरेल, असे सांगितले जात आहे.