सगळेच निघून गेले तर पक्षात उरणार कोण ? पायलट यांच्या बंडाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याचा सवाल

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –   राजस्थानचे उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांनी केलेल्या बंडखोरीमुळे काँग्रेसच्या गोटात सध्या चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. पायलट यांच्यासोबत त्यांच्या समर्थक आमदारांचा मोठा गट असून पायलट यांच्या बंडखोरीमुळे मुख्यमंत्री गेहलोत यांच्या नेतृत्वाखालील सरकार अस्थिर झाले आहे. त्यामुळे काँग्रेसकडून नाराज पायलट आणि त्यांचे समर्थक आमदार यांची मनधरणी करून पायलट यांचे बंड थंड करण्याठी गेहलोत यांच्यासह पक्षश्रेष्ठींनी जोर लावला आहे. मात्र, एका पाठोपाठ एक युवा नेते पक्ष सोडत असल्याने सगळेच निघून गेले तर पक्षात उरणार कोण असा सवाल काँग्रेसच्या महाराष्ट्रातील एका ज्येष्ठ नेत्याने उपस्थित केला आहे.

महाराष्ट्रातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते संजय निरुपम यांनी सचिन पायलट यांच्या बंडखोरीवर प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की, राजस्थानमध्ये निर्माण झालेल्या राजकीय संकटावर एकच उत्तर आहे. ते म्हणजे सचिन पाययलट यांना रोखणे. त्यांची समजूत काढून चर्चेच्या माध्यमातून तोडगा काढला पाहिजे. असाच जर प्रत्येक जण पक्षातून निघून जाऊ लागला, तर शेटी पक्षात उरणार कोण ? असा प्रश्न निरुपम यांनी उपस्थित केला आहे.

दरम्यान, सचिन पायलट यांची नाराजी समोर आल्यानंतर कपिल सिब्बल, शशी थरुर, कार्ती चिदंबरम यांच्यासह काँग्रेसच्या अनेक वरिष्ठ नेत्यांना आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. तसेच केंद्रीय नेतृत्वाने याबाबत लक्ष घातले पाहिजे, असे मत व्यक केले आहे. यापूर्वी ज्योतिरादित्य शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतरही काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या होत्या. मात्र, त्यावेळी शिंदे यांची नाराजी दूर करून त्यांना रोखण्यात काँग्रेसला अपयश आले.