‘फॅमिली प्लॅनिंग केले असते तर लस कमी पडली नसती’ – उदयनराजे भोसले

सातारा : पोलीसनामा ऑनलाइन –   राज्यात सध्या कोरोना प्रतिबंधात्मक लसीचा तुटवडा जाणवत आहे. त्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांकडून आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. त्यानंतर आता याच मुद्यावरून भाजप खासदार खासदार उदयनराजे भोसले यांनी भाष्य केले आहे. ‘प्रत्येकाने लस घ्यावी. फॅमिली प्लॅनिंग केले असते तर लस कमी पडली नसती’, असे ते म्हणाले.

देशात कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण केले जात आहे. मात्र, राज्यात सध्या लसींचा तुटवडा जाणवत आहे. येत्या दोन-तीन दिवस पुरेल इतकाच साठा शिल्लक असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले आहे. त्यावर उदयनराजे भोसले यांनी वक्तव्य केले. ते म्हणाले, ‘महाराष्ट्राला जास्त दिले आणि कुठल्या राज्याला कमी दिले जाते हा वाद निर्माण करू नका. महाराष्ट्राला जास्त कशाला मिळाले पाहिजे. प्रत्येक राज्याच्या लोकसंख्येच्या क्षमतेप्रमाणे लस दिली पाहिजे’. तसेच कोणत्या कालावधीत व्हायरस बाहेर येतो, कोणत्या कालावधीत झोपलेला असतो, असे म्हणता येणार नाही. त्यामुळे प्रत्येकाने लस घ्यावी. मात्र, प्रत्येकाने फॅमिली प्लॅनिंग केले असते तर आज लसीचा तुटवडा जाणवला नसता आणि ही परिस्थिती निर्माण झाली नसती, असेही ते म्हणाले.

…हा तर लोकसंख्येचा भाग

इतर देशांची लोकसंख्या बघा आणि आपली बघा. लसीच्या पुरवठ्यासाठी मी आरोग्यमंत्री व मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिणार आहे. लसीबाबत राज्य सरकार केंद्राकडे बोट दाखवून उपयोग नाही. हा लोकसंख्येचा भाग आहे. कितीही केले तरी कमीच पडणार आहे, असेही ते म्हणाले.