‘गावात दमबाजी केल्यास गाठ माझ्याशी’ : आमदार रोहित पवार

पोलीसनामा ऑनलाईन टीम: कर्जत-जामखेड मतदारसंघात पवार आणि भाजपचे माजी मंत्री प्रा. राम शिंदे यांच्या कार्यकर्त्यांमध्ये चुरस आहे. बहुतांश गावांत अशाच चुरशीने निवडणुका लढविल्या जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे गैरप्रकार घडण्याची शक्यता आहे. अशावेळी बक्षीस म्हणून निधी जाहीर करताना आमदार पवार यांनी इशाराही दिला आहे. दरम्यान, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोणी स्थानिक पातळीवर सर्वसामान्य लोकांना दमबाजी, दबावतंत्र, दडपशाही व अन्य काही मार्गाचा अवलंब करून त्रास देण्याचा प्रयत्न केला तर त्यांची गय केली जाणार नाही. असा कोणताही प्रकार कोणी करू नये. अन्यथा, लक्षात ठेवा गाठ माझ्याशी आहे, असा कडक इशाराच पवार यांनी दिला आहे.

कर्जत-जामखेडचे राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी उशिरा का होईना ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करण्यासाठी गावांना बक्षीस म्हणून निधी देण्याच्या योजनेत सहभाग घेतला आहे. निवडणूक बिनविरोध करणाऱ्या गावाला ३० लाखांचा निधी देण्याची घोषणा करतानाच निवडणुकीत दडपशाही आणि दमबाजी करणाऱ्यांनाही त्यांनी इशारा दिला आहे. कोणी असे प्रकार केले तर गाठ माझ्याशी आहे, सज्जड इशाराच पवार यांनी दिला आहे. (Rohit Pawar On Gram Panchayat Election )

संवेदनशील आमदार म्हणून ओळख असलेल्या रोहित पवार यांनीही अशी घोषणा करण्याची मागणी त्यांच्या मतदारसंघातून होत होती. बहुतांश उमेदवारांचे अर्ज भरून झालेले असताना आणि शेवटचे दोनच दिवस बाकी असताना पवार यांनी अखेर ही घोषणा केली. त्यामुळे ज्या गावांना निवडणूक बिनविरोध करायची आहे, त्यांना उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी उमेदवारांची मनधरणी करावी लागणार आहे. कर्जत तालुक्यातील ५६ तर जामखेड तालुक्यातील ४९ गावांच्या ग्रामपंचायतींची निवडणूक होत आहे. यातील बिनविरोध निवडणूक होणाऱ्या गावांना आमदार निधीतून, सीएसआर फंडातून ३० लाखांचा विकास निधी देण्याची घोषणा पवार यांनी केली आहे.

राज्यातील ग्रामपंचायतींची निवडणूक सध्या सुरू आहे. उद्या (३० डिसेंबर) उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम मुदत आहे. ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठिकठिकाणच्या आमदारांनी पुढाकार घेत अशा गावांना स्थानिक विकास निधीतून २५ लाखांचा निधी देण्याची घोषणा केली आहे. पारनेरचे राष्ट्रवादीचे आमदार नीलेश लंके यांनी घोषणा केल्यानंतर अल्पावधितच राज्यातील विविध पक्षांच्या आमदारांनी आपापल्या भागात अशी घोषणा केली. त्यानुसार अनेक ठिकाणी निवडणुका बिनविरोध होत आहेत.