Coronavirus : प्राण्यांना असंच मारत राहिला मनुष्य तर आणखी अनेक आजार होतील – संयुक्त राष्ट्र

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – यूएन इन्व्हॉयर्नमेंट प्रोग्राम अँड इंटरनॅशनल लाईव्हस्टॉक रिसर्च इन्स्टिट्यूटच्या एका अहवालानुसार, कोरोना व्हायरससारख्या धोकादायक संसर्गासाठी पर्यावरणाला सतत नुकसान, नैसर्गिक स्त्रोतांचे वन्य शोषण, हवामान बदल आणि वन्य प्राण्यांचा छळ यासारखी कारणे जबाबदार आहेत.

संयुक्त राष्ट्रातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, प्राणी व पक्षी यांच्यापासून मानवांमध्ये पसरणाऱ्या आजारांमध्ये गेल्या काही वर्षांत निरंतर वाढ झाली आहे. विज्ञानाच्या भाषेत अशा आजारांना ‘जुनोटिक डिसीज’ म्हणतात.

तज्ञांनी इशारा दिला आहे की, मानवाने जर वातावरण आणि वन्य प्राण्यांना वाचवले नाही, तर त्यांना कोरोनासारख्या अधिक धोकादायक आजाराचा सामना करावा लागू शकतो.

संयुक्त राष्ट्राच्या अहवालानुसार, प्रथिनांच्या वाढत्या मागणीसाठी जनावरे मारली जात आहेत आणि याचा परिणाम मानवालाच भोगावा लागत आहे.

दरवर्षी लाखो लोकांचा मृत्यू
तज्ञ म्हणतात की, दरवर्षी सुमारे २० लाख लोक प्राण्यांमुळे होणाऱ्या वेगवेगळ्या आजारांमुळे मृत्यू पावतात.

गेल्या काही वर्षांत मानवामध्ये जनावरांमुळे होणाऱ्या आजारांमध्ये म्हणजे ‘जुनोटिक डिसीज’मध्ये वाढ झाली आहे. इबोला, बर्ड फ्लू आणि सार्स सारखे आजार या श्रेणीत येतात.

पहिले हे रोग प्राणी आणि पक्ष्यांमध्ये आढळतात आणि मग ते मानवांना आपला शिकार करतात.

अहवालात म्हटले आहे की, जुनोटिक रोगांच्या वाढीमागील एक प्रमुख कारण म्हणजे स्वतः मानव आणि त्याचे निर्णय.

प्रचंड वाढले आहे मांसाचे उत्पादन
यूएन इन्व्हॉयर्नमेंट प्रोग्रामच्या कार्यकारी संचालक इंगर अँडरसन म्हणाल्या की, गेल्या १०० वर्षात मानवांना नवीन विषाणूमुळे कमीतकमी सहा प्रकारच्या धोकादायक संक्रमणांचा सामना करावा लागला आहे.

“मध्यम व निम्न उत्पन्न असणार्‍या देशांमध्ये दरवर्षी कमीतकमी गिल्टी रोग, चतुष्पादमुळे होणारा टीबी आणि रेबीज सारख्या जुनोटिक आजारामुळे २० लाख लोकांचा मृत्यू होतो. एवढेच नव्हे तर या आजारांमुळे कितीतरी आर्थिक नुकसानही होते,” असे त्या म्हणाल्या.

इंगर अँडरसन म्हणाल्या, “गेल्या ५० वर्षात मांस उत्पादन २६०% वाढले आहे. काही असे समुदाय आहेत जे पाळीव प्राणी आणि वन्य प्राण्यांवर मोठ्या प्रमाणात अवलंबून आहेत. आपण शेती वाढवली आहे आणि नैसर्गिक स्त्रोतांचे शोषणही करत आहोत. आपण वन्य प्राण्यांच्या वस्ती नष्ट करत आहोत. त्यांचा जीव घेत आहोत.”

धरणे, सिंचन सुविधा, कारखाने आणि शेती देखील मानवामध्ये होणाऱ्या संक्रामक आजारांसाठी २५% कारणीभूत आहेत, असेही त्या म्हणाल्या.

कशी सुधारेल समस्या?
या अहवालात केवळ समस्यांची गणनाच केली गेली नाही, तर भविष्यात अशा प्रकारचे आजार कसे टाळता येतील हेदेखील सरकारला समजावून सांगितले आहे.

पर्यावरणाचा ऱ्हास कमी करणाऱ्या शेतीला प्रोत्साहन देणे आणि जैवविविधता टिकवून ठेवण्याच्या मार्गांवर अहवालात तज्ञांनी सविस्तरपणे सांगितले आहे.

अँडरसन म्हणतात, “विज्ञान स्पष्टपणे दाखवत आहे की जर आपण पर्यावरणाशी खेळत राहिलो, जंगल आणि प्राण्यांचे नुकसान करत राहिलो तर येत्या काही वर्षांत प्राण्यांपासून मानवांमध्ये पसरणारे रोग देखील वाढतील.”

त्यांनी म्हटले की, भविष्यात कोरोना विषाणू संसर्गासारख्या धोकादायक आजारापासून बचाव करण्यासाठी मानवांना पर्यावरणाचे व प्राण्यांचे रक्षण करण्याविषयी अधिक चिंता करावी लागेल.