‘मी खलनायक असेन तर, उदयनराजे प्रेम चोप्रा: शिवेंद्रराजे भोसले

सातारा: पोलीसनामा ऑनलाईन

खासदार उदयनराजे भोसले यांनी नुकतीच शिवेंद्रराजे भोसले यांच्यावर टीका केली होती. याला प्रत्युत्तर देताना शिवेंद्रराजे यांनी उदयनराजेंवर हल्ला चढवला, “टीका करायला मुद्दे नसले की लोक वैयक्तिक पातळीवर येतात. ते मला खलनायक बोलले, ठिक आहे. मला खलनायकाची भूमिका घ्यायला का लागली? तुमचे राजकारण हे प्रेम चोप्रासारखे आहे. शेवटी प्रेम चोप्राला उत्तर द्यायला पाहिजे. मी अमोल पालेकरांची भूमिका घेऊ शकत नाही”, असा घणाघात साताऱ्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी खासदार उदयनराजे भोसले यांच्यावर केला.

उदयनराजे भोसले यांनी नुकतंच पत्रकार परिषद घेऊन, शिवेंद्रराजे भोसले यांच्यावर तुफान टीका केली होती. ‘लोकांची कामं करतो म्हणूनच कॉलर उडवतो. तुम्ही कामाच्या बाबतीत बोला. मी असं केलं आणि तसं केलं अशी फालतूगिरी नको. “दुसऱ्यांवर चिखलफेक करायला अक्कल लागत नाही. लोकांची कामं करुन घ्यायला अक्कल लागते. सर्व जाहिरनामे काढून समोर बसा. यांचे संकुचित विचार असतील तर त्यात माझा दोष नाही”, अशी टीकाही उदयनराजेंनी शिवेंद्रराजेंवर टीका केली होती.

शिवेंद्रराजे पुढे म्हणाले , “तुमची दहशत आहे, त्याला जशास तसं उत्तर द्यायला लागते. त्यांना पण कळून चुकले आहे की आता पूर्वीची परिस्थिती राहिली नाही. त्यामुळे ते वैयक्तिक आरोप करत आहेत. ‘ते काल म्हणाले खुडूक कोंबडी आहे. पण खासदारांना कोंबड्या खुडूक आहेत की अंड्याला आल्या हे तपासण्याचे  ट्रेनिंग कधी मिळायला लागले? त्यांना मिळाले असेल तर ते सर्किट हाऊसला तपासत बसतात की ऑफिसर्स क्लबवर तपासतात हे मला माहित नाही.

‘….. अक्कल लागत नाही’

“कॉलर प्रत्येकाच्या शर्टला असते. कॉलर उडवायला अक्कल लागत नाही.  तुम्ही कामाचे बोला. किती कामे झाली हे सांगा”, असा प्रतिप्रश्नही शिवेंद्रराजेंनी यावेळी केला. ते नेहमी म्हणतात समोरासमोर या. आम्ही आलो होतो, तर तुम्ही का पळून गेला? पळपुटेपणा का दाखवला, असा  प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

मला डायलॉग मारायची गरज नाही

मला लोकांसमोर जायला मी दाढी काढतो, मिश्या काढतो, भुवया काढतो असे डायलॉग मारायची गरज लागत नाही. अनेकवेळा ते घोषणा करतात की काम झाले नाही तर मिश्या काढेन, भुवया काढेन वगैरे, पण काहीच नाही, नुसती डायलॉगबाजी.