कंगनानं ड्रग्ज घेतलं असल्यास त्याची चौकशी व्हावी, भाजपा नेत्याची मागणी

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास सीबीआय करत आहे. त्यातच दुसरीकडे, नार्कोटिक्स ब्युरो अमली पदार्थांची चौकशी करत आहे. यामध्ये अनेक मोठ्या बॉलिवूड कलाकारांची नावे समोर आली आहे. अशातच विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी ‘कंगना जर अमली पदार्थांचे सेवन करत असेल तर तिची सुद्धा चौकशी करण्यात यावी,’ अशी मागणी केली आहे. ते पुण्यात पत्रकार परिषदेत बोलत होते.

सुशांत सिंह आत्महत्येबाबत सातत्याने प्रश्न उपस्थित करणारी अभिनेत्री कंगना राणौतवर ड्रग्जचे सेवन केल्याचा आरोप करण्यात येत आहे. त्यावरुन ड्रग्ज प्रकरणी कंगनाची चौकशी व्हावी अशी मागणी करण्यात आली आहे. त्यातच आता भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी सुद्धा कंगनाच्या चौकशीची मागणी केली आहे. ते म्हणाले, ‘ड्रग्ज प्रकरणात जो न्याय इतरांना तोच न्याय कंगनाला. ती काही या देशाची वेगळी नागरिक नाही आहे. कायदा सर्वाना समान आहे. कुणीही कोणाला पाठीशी घालण्याची गरज नाही,’ असे दरेकर यांनी स्पष्ट केलं.

तथापि, मराठा आरक्षण आणि एकनाथ खडसे यांच्या पक्षांतराच्या मुद्द्यांवरही दरेकर यांनी पत्रकार परिषदेत भाष्य केलं. मराठा समाजास आर्थिक दुर्बल घटकांच्या दिलेल्या सवलीबाबत समाज समाधानी नाही. मराठा समाजाला भरघोस पॅकेज द्यायला हवे पण, सरकारकडून मलमपट्टी सुरु असल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच एकनाथ खडसे पक्षांतर करणार का या प्रश्नावर त्यांनी, एकनाथ खडसे जेष्ठ नेते असून त्यांना सन्मान देण्यासाठी केंद्रीय समिती आहे. या विषयावर मी बोलणे उचित नसल्याचे सांगून त्यांनी यावरती बोलणे टाळले.

हे सरकार अहंकारी

पुण्यात कोरोनाचा प्रसार वाढत आहे. यावर कोणाचेही लक्ष नाही. राज्य सरकार आमच्या सूचना लक्षात घेत नाही. सरकारने विरोधी पक्षाला सोबत घेतले असते तर, आतापर्यंत कोरोनावर नियंत्रण मिळवणे शक्य झाले असते. मात्र, हे सरकार अहंकाराने ग्रासलेले आहे, अशी टीका दरेकर यांनी केली.