‘व्हॅलेन्टाईन डे’च्याआधी कपल गार्डनची घोषणा न केल्यास तीव्र आंदोलन करू : ‘राईट टू लव्ह’ चा इशारा

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – सांस्कृतिक शहर अशी ओळख असणाऱ्या पुण्यात प्रेमी युगुलांना भेटण्यासाठी एकही हक्काचे ठिकाण किंवा गार्डन नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे अनेक कपल्सना भेटण्यासाठी एखादी टेकडी किंवा ब्रीजाचा आधार घ्यावा लागतो. परंतु अशा ठिकाणी भेटणे मात्र कपल्ससाठी धोक्याचे ठरते. रात्रीच्या वेळी अनेकदा प्रेमी युगुलांना त्रास दिल्याच्या घटना समोर येतात शिवाय विनयभंग, लैंगिक अत्याचार असेही प्रकार समोर येतात.

अनेकदा पोलिसांकडूनही प्रेमी युगुलांना एखाद्या ठिकाणाहून हुसकावून लावले जाते. याच पार्श्वभूमीवर राईट टू लव्ह या संघटनेने पुणे महानगरपालिकेकडे कपल गार्डनची मागणी केली होती. परंतु अद्याप महानगरपालिकेने कपल गार्डनची घोषणा केल्याचे दिसत नाही. याच पार्श्वभूमीवर राईट टू लव्ह संघटनेने पुन्हा एकदा पुणे महानगरपालिकेला याबाबत(दि- 11 फेब्रुवारी 2018 रोजी) स्मरणपत्र पाठवले आहे. शिवाय 14 फेब्रुवारीच्या(व्हॅलेन्टाईन डे) आधी जर पुणे मनपा क्षेत्रातील काही गार्डन्स कपल गार्डन म्हणून घोषित केले नाही तर पुणे महानगर पालिकेच्या विरोधात व्हॅलेन्टाईन डेच्या दिवशी तीव्र आंदोलन करू असा ईशारा राईट टू लव्ह संघटनेने दिला आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, राईट टू लव्ह संघटनेने 9 फेब्रुवारी 2018 रोजी कपल गार्डनची मागणी करणारे निवेदन पुणे महानगरपालिकेकडे दिले होते. तब्बल वर्षभर संस्थेकडून पाठपुरावा करूनही या विषयाकडे महानगरपालिकेकडून दुर्लक्ष होत असल्याचे राईट टू लव्ह संस्थेचे म्हणणे आहे. यामुळेच आता जर महानगरपालिकेने याकडे दुर्लक्ष केले आणि कपल गार्डनची घोषणा केली नाही तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा संस्थेने दिला आहे. अभिजित कांबळे, अॅड. विकास शिंदे, दीप्ती नितनवरे, सुशांत सोनोने, मयुरी सुषमा मदन, रवी कृपाल अशी राईट टू लव्ह ही संस्था चालवणाऱ्यांची नावे असून प्रेमाच्या आणि प्रेम करणारांच्या हितासाठी आणि सुरक्षेसाठी ते काम करत आहेत.

दरम्यान, राईट लव्ह ही एक प्रेमाचे समर्थन करणारी संस्था असून प्रत्येकाला प्रेम करण्याचा मूलभूत आणि नैसर्गिक अधिकार आहे. शिवाय प्रत्येकाला हा अधिकार कोणत्याही अडथळ्याशिवाय निभावता तसेच उपभोगता आला पाहिजे अशी या संस्थेची भूमिका आहे. प्रेमाची संस्कृती जपण्याचे काम ही संस्था करत आहे. अनेकदा कपल भेटण्यासाठी सिम्बाॅयसिस टेकडी, तळजाई टेकडी, पर्वती टेकडी, झेड ब्रीज अशा ठिकाणांचा सहारा घेतात.

पंरतु यामुळे त्यांना, मारहाण, शिवीगाळ अशा प्रकारांना सामोरे जावे लागते. शिवाय झेड ब्रीजवर थांबल्याने पोलिसांकडून कारवाया झाल्याच्या घटनाही समोर आल्या आहेत असे या संस्थेचे म्हणणे आहे. याशिवाय सिम्बाॅयसिस टेकडी, पर्वती टेकडी येथून लैंगिक अत्याचाराचे घडलेले प्रकरणही ताजे आहे. अनेकदा काही संस्कृती रक्षकांकडूनही कपल्सना त्रास दिला जातो. याच पार्श्वभूमीवर राईट टू लव्ह ही संस्था कपलच्या सुरक्षेच्या आणि प्रेम जपण्याच्या हेतूने कपल गार्डनची मागणी करत आहे. परंतु पुणे महानगरपालिकेकडून मात्र याकडे दुर्लक्ष होताना दिसत आहे.