‘दिवे’ बंद केल्यास ‘राज्य’ अंधारात जाण्याची भिती, ऊर्जा मंत्री डॉ. नितीन राऊत यांच्याकडून ‘लाईट’ चालू ठेवण्याचं ‘आवाहन’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ५ एप्रिल रोजी रात्री ९ वाजता आपआपल्या घरातील लाईट बंद करुन ९ मिनिटे दिवे आणि टॉर्च लावून कोरोना विरोधात लढा देण्याचे देशभरातील जनतेला आवाहन केले आहे. त्याला २२ मार्च प्रमाणे देशभर मोठा प्रतिसाद मिळण्याची शक्यता आहे. मात्र, त्यामुळे देशभरातील नॅशनल ग्रीडला मोठा धोका होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अचानक देशभरातून वीजेची मागणी कमी झाल्यास त्याप्रमाणे वीज उत्पादन पटकन कमी करता येत नाही. त्यामुळे उत्पादन अधिक आणि मागणी अचानक घटल्याने सर्व वीज यंत्रणेवर लोड येऊन मल्टी ग्रीड फेल्युर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे देशभरातील सर्व वीज पुरवठा केंद्र बंद पडण्याचा धोका आहे. त्याचवेळी ज्यांनी वीज पुरवठा चालू ठेवला त्यांच्याकडे अचानक पॉवर वाढून त्यांच्याकडील सर्व यंत्रणा निकामी होण्याचा धोका आहे. विशेषत: आपत्कालीन काळात चालू राहणारी हॉस्पिटल व इतर सार्वजनिक संस्थांचे प्रकल्प त्यामुळे अडचणीत येण्याची शक्यता आहे.

अनेकदा आपल्या शहरातील एखाद्या भागात सायंकाळी ७ अथवा १० वाजण्याच्या सुमारास अचानक वीजेचा पुरवठा अधिक होऊन वीजेची उपकरणे बिघाडाच्या तक्रारी नेहमीच येत असतात. असा प्रकार वीजेची मागणी वाढली अथवा कमी झाली तर, शहर, राज्य आणि देशभरात होण्याची शक्यता आहे.

हा धोका ओळखून ऊर्जा मंत्री डॉ. नितीन राऊत यांनी जनतेनेही आवश्यक तितकेच लाईट चालू ठेवून, दिवे मेणबत्ती इत्यादी लावावेत, असे आवाहन केले आहे. देशात एकाचवेळी लाईट बंद केल्यास विजेची मागणी कमी होऊ शकते. लॉक डाऊनमुळे आधीच विजेची मागणी घटल्याने वीज उत्पादन आणि मागणी यातील गणित बदलले आहे. जर सर्वांनी एकाच वेळी लाईट बंद केल्यास अजून परिस्थिती बदलण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. ग्रीडमध्ये अचानक विजेची मागणी वाढल्या किंवा मागणी कमी झाल्यास फ्रिक्वेन्सी मध्ये अनावश्यक बदल होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

संभाव्या धोका लक्षात घेता आपल्या राज्यात महानिर्मिती, महापारेषण, महावितरण आणि महाराष्ट्र राज्य भार प्रेषण केंद्र या सर्वांनी योग्य ती खबरदारी घ्यावी, असे आदेश डॉ. राऊत यांनी वीज कंपन्यांना दिले आहेत.विजेच्या मागणीत अचानक वाढ झाल्यास त्याचा लोड वीज निर्मिती केंद्रावर येतो. वीज निर्मिती केंद्राच्या सुरक्षेसाठी असा प्रमाणाबाहेर लोड आला तर ते निर्मिती केंद्र बंद होते. त्याचा लोड दुसर्‍या केंद्रावर येतो व अशी एका पाठोपाठ राज्यातील केंद्रे बंद पडतात. हा लोड नॅशनल ग्रीडवर गेल्यास नॅशनल ग्रीडची आपत्कालीन यंत्रणा कार्यन्वित होऊन वीज पुरवठा बंद पडतो.

देशात यापूर्वी विजेचे उत्पादन कमी आणि मागणी अचानक जास्त वाढल्यावर असे प्रकार ८ -१० वर्षांपूर्वी अनेकदा झाले होते. आता वीज निर्मिती मागणीपेक्षा अधिक असल्याने असा प्रकार होऊ शकत नाही. वीज निर्मिती केंद्र टप्प्या टप्प्याने बंद करावे लागते. एक वीज निर्मिती केंद्र बंद करायला ५ ते ६ दिवस लागतात.

सर्वांनी अचानक दिवे बंद केल्यास सर्व पॉवर स्टेशन हाय फ्रिक्वेन्सी वर जाऊ शकतात. परिणामी आपल्या ग्रीडमध्ये अनावश्यक फीडर ट्रीपिंग्स येऊ शकतात. मोठ्या प्रमाणावर पॉवर डिमांड असलेल्या महाराष्ट्रासारख्या इतर राज्यात वीज फेल्युरमुळे सर्व पॉवर स्टेशन बंद पडल्या. मल्टी स्टेट ग्रीड फेल्युर होईल आणि संपूर्ण देश अंधारात जाईल. यामुळे अत्यावश्यक सेवा, हॉस्पिटल सेवा विस्कळीत होण्याची शक्यता आहे. त्यानंतर एक पॉवर स्टेशन सर्व्हिसमध्ये यायला साधारणत: १६ तास लागतात. याप्रमाणे सर्व परिस्थिती साधारण व्हायला एक आठवड्याचा कालावधी लागेल. त्यामुळे अचानक सर्वांनी घरातील दिवे बंद केल्यास देश अंधारात जाऊ शकतो, असे महावितरण कंपनीतील एका  अधिकार्‍याने सांगितले. त्यामुळेच ऊर्जा मंत्री नितिन राऊत यांनी लाईट चालू ठेवण्याचे आवाहन केले आहे.