भाजपने आदेश दिल्यास सोलापूर लोकसभा निवडणूक लढवणार, ‘या’ दिग्गजानं सांगितलं

पंढरपूर : पोलीसनामा ऑनलाइन – सोलापूर लोकसभा मतदारसंघातील भाजपचे खासदार डॉ. जयसिद्धेश्वर स्वामी यांचे जातीचे प्रमाणपत्र जात पडताळणी समितीने रद्द केल्याचा निकाल दिला आहे. त्यानंतर आता सोलापूर लोकसभा मतदार संघामध्ये पोटनिवडणूक होणार की न्यायालयात आव्हान दिले जाणार अशी चर्चा सुरु आहे. यातच भाजपने जर आपणास पक्षादेश दिला, तर आपण सोलापूर लोकसभेची पोट निवडणूक लढवण्यास तयार आहोत, अशी घोषणा लक्ष्मणराव ढोबळे यांनी आज पंढरपूरमध्ये पत्रकार परिषदेत केली. लोकसभा निवडणुकीच्यावेळी माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे हे निवडणूक लढवण्यास इच्छूक होते.

भाजपचे विद्यमान खासदार डॉ. जयसिद्धेश्वर स्वामी यांचे जातीचे प्रमाणपत्र रद्द करण्यात आले आहे. सोलापूर लोकसभेची निवडणूक लागली तर यावेळी पक्षाने आदेश दिल्यास आपण सोलापूर लोकसभा निवडणूक लढवू असा ठाम विश्वास ढोबळे यांनी पंढरपूरात व्यक्त केला. पंरतु, असे असले तरी स्वामींचे प्रमाणपत्र उच्च न्यायालायत खरे ठरेल असा आशावादही ढोबळे यांनी पत्रकार परिषदेत बोलून दाखवला.

मागील लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी केंद्रीय गृहमंत्री सुशिलकुमार शिंदे, वंचित बहुजन आघाडीचे डॉ. प्रकाश आंबेडकर यांना पराभूत करून भाजपचे डॉ. जयसिद्धेश्वर स्वामी विजयी झाले. मोठ्या फरकाने त्यांनी विजय मिळवला. मात्र त्यांनी जोडलेले बेडा जंगमचे जात वैधता प्रमाणपत्र बनावट असल्याचा आरोप प्रमोद गायकवाड यांनी केला होता. त्यांनी जात वैधता पडताळणी समितीकडे अपिल केले होते. समितीने स्वामी यांनी जोडलेल्या कागदपत्रांची पडताळणी केल्यानंतर ते बनावट असल्याचे लक्षात आले. त्यानुसार त्यांचे जात वैधता प्रमाणपत्र रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.