पवित्र मातीचा रसगुल्ला मी प्रसाद म्हणून स्वीकारेन, मोदींचे ममतांना प्रत्युत्तर

श्रीरामपूर : वृत्तसंस्था – पश्चिम बंगाल मध्ये भाजप आणि तृणमूल काँग्रेस यांच्यातील वैर सगळ्यांनाच ठाऊक आहे. बंगालच्या मातिचा रसगुल्ला करुन त्यात दगड घालून नरेंद्र मोदींना खाऊ घालू असे म्हणणाऱ्या ममता बॅनर्जींना आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रत्युत्तर दिले आहे. “अनेक महापुरुषांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीतील माती आणि दगडांपासून तयार केलेला रसगुल्ला मी प्रसाद म्हणून स्वीकारेल असे नरेंद्र मोदी यांनी म्हंटले आहे. बंगालमध्ये श्रीरामपूर येथे झालेल्या सभेदरम्यान ते बोलत होते.

काय म्हणाल्या होत्या ममता बॅनर्जी ?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधताना मातीपासून मिठाई तयार करु आणि त्यामध्ये दगडांचा वापर करु. ही मिठाई मोदींना पाठवू, यामुळे मिठाई खाताना त्यांचे दात तुटतील, असा टोला ममता बॅनर्जी यांनी नरेंद्र मोदींना लगावला होता. बालुरघाट आणि गंगारामपूर इथं झालेल्या जाहीर सभेत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला.

यावेळी ‘नरेंद्र मोदी याआधी पश्चिम बंगालमध्ये कधी आले नाहीत, आणि आता त्यांना बंगालमधून मते हवी आहेत. आम्ही त्यांना बंगालमधील रसगुल्ला देऊ. आम्ही मातीपासून मिठाई तयार करु आणि त्यात दगडांचा वापर करू. ज्याप्रमाणे लाडू तयार करताना त्यात काजू, बेदाणे वापरतात त्याऐवजी दगडांचा वापर करु. यामुळे त्यांचे दात तुटतील’, असे ममता बॅनर्जी यांनी म्हटले आहे. पश्चिम बंगालमध्ये भाजपाला २०१४ मध्ये दोन जागा मिळाल्या होत्या. यावेळी त्यांना मोठा रसगुल्ला म्हणजे भोपळा मिळेल अशी टीकाही ममता बॅनर्जी यांनी यावेळी केली.

या टीकांची सुरुवात अभिनेता अक्षय कुमार याने घेतलेल्या मोदींच्या मुलाखतीनंतर झाली होती. या मुलाखतीदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘ममता बॅनर्जी मला दरवर्षी कुर्ता पाठवतात’ अशी उपहासात्मक टिका केली होती त्याला उत्तर म्हणून ‘मातीचा रसगुल्ला खायला देऊ असे ममता म्हणाल्या होत्या. आता त्याला मोदींनी हा रसगुल्ला प्रसाद म्हणून स्वीकारू असे प्रत्युत्तर दिले आहे.