‘नमो’ पुन्हा सत्‍तेत आल्यास अमित शाह देशाचे गृहमंत्री होतील ; ‘या’ मुख्यमंत्र्याच्या भाकिताने खळबळ

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आम आदमी प्रमुख आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्यावर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे. जर नरेंद्र मोदी देशाचे पुन्हा पंतप्रधान झाले तर अमित शहा हे गृहमंत्री होतील, त्यानंतर देशाचे काय होईल याचा विचार करून मतदान करा, असे आवाहन दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मतदारांना केलं आहे. एक ट्विट करून केजरीवालांनी हे वक्तव्य केले आहे. दिल्लीच्या सातही मतदारसंघांमध्ये १२ मे रोजी मतदान पार पडत आहे.

पंतप्रधानांचे सर्वात विश्वासू सहकारी म्हणून ओळखले जाणारे अमित शहा यावेळी गुजरातच्या गांधीनगरमधून निवडणूक लढवत आहेत. सातवेळा गांधीनगरहून लोकसभेवर निवडून जाणारे ज्येष्ठ भाजप नेते लालकृष्ण आडवाणी यांना डावलून अमित शहांना गांधीनगरचे तिकीट भाजपने दिलं आहे. शहा विजयी झाल्यास केंद्रातील महत्त्वाचं खातं त्यांच्या पदरी पडेल अशी कुजबूज राजकीय वर्तुळात सुरू आहे.

का म्हणाले केजरीवाल असे :
पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना अमित शहा गुजरात मध्ये मोदींच्या मंत्रिमंडळात गृहराज्यमंत्री होते, त्यामुळे शहांची या ठिकाणी वर्णी लागू शकते असे बोलले जात आहे. शहा गुजरातचे गृहमंत्री असताना सोहराबुद्दीन आणि इशरत जहाँचे एन्काउन्टर करण्यात आले होते. तसंच अमित शहांनी याआधीही तुरुंगाची हवाही खाल्ली आहे. तसेच ते दोन वर्षासाठी तडीपार देखील होते. त्याचप्रमाणे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी देखील अमित शहा यांना खुनी अध्यक्ष म्हणून संबोधले होते. त्यामुळे या इतिहासाचा विचार करून केजरीवालांनी हे वक्तव्य केले असल्याची चर्चा आहे. दिल्लीत भाजप, काँग्रेस आणि आपमध्ये यंदा तिरंगी लढत रंगणार आहे.