‘माझ्यावरील आरोप सिद्ध झाल्यास जीवनच संपवून टाकेन’ : धनंजय मुंडे

परळी (बीड) : पोलीसनामा ऑनलाइन – राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांची 17 तारखेला विडा येथे झालेल्या भाषणाची एक क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने वाद निर्माण झाला आहे. या प्रकरणी स्पष्टीकरण देण्यासाठी धनंजय मुंडे यांनी पत्रकार परिषद घेतली. आमच्या बहीण-भावाच्या नात्यात कुणीतरी विष कालवण्याचा प्रयत्न करत आहे. ग्रामविकास मंत्री आणि आपली बहीण पंकजा मुंडे यांच्या विरोधात आपण आक्षेपार्ह विधान केले हे सिद्ध केल्यास मी माझे जीवनच संपवून टाकीन असे उद्विग्न विधान धनंजय मुंडे यांनी केले आहे.

ही व्हिडिओ क्लिप एडिट करून तयार करण्यात आल्याचा आरोपही धनंजय मुंडे यांनी केला आहे. ही व्हिडिओ क्लिप फॉरेन्सिक लॅबमध्ये नेऊन तपासावी अशी मागणीही त्यांनी पत्रकार परिषदेत केली.

व्हायरल झालेल्या क्लिपवर भूमिका मांडताना धनंजय मुंडे म्हणाले की , ‘मी कधीही कुणाचं मन दुखावेल असं बोललो नाही. मतांच राजकारण कधीच केलं नाही. बहिणीसाठी मी मतदारसंघांचा त्याग केला होता. मी नाती कशी सांभाळतो हे जनतेला माहिती आहे. मात्र, नव्यानं आलेल्या भावांनी आमच्या नात्यात विष कालवण्याचा प्रयत्न केला आहे. माझ्या भाषणाची क्लिप पूर्ण ऐकली असती तर असे झाले नसते. मी तसे बोललो असेन तर फॉरेन्सिक लायब्ररीत जाऊन तपासणी करा. माझ्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला. आमच्या बहीण-भावाच्या नात्यात कुणीतरी विष कालवण्याचा प्रयत्न करत आहे. पंकजा मुंडे यांच्या विरोधात आपण आक्षेपार्ह विधान केले हे सिद्ध केल्यास मी माझे जीवनच संपवून टाकीन.’

धनंजय मुंडे यांना नोटीस
धनंयज मुंडे यांच्या विरोधात परळी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यांतर राज्य महिला आयोगानेही या प्रकरणाची गंभीर दखल घेत धनंजय मुंडे यांना नोटीस पाठवली आहे.याविषयी बोलताना धनंजय मुंडे म्हणाले, ‘कालच्या प्रकारानंतर माझ्याविरुद्ध लगेच केस दाखल केली जाते. आमच्या लोकांनी दिलेल्या तक्रारीची दखलही का घेतली जात नाही?’ असा सवाल त्यांनी केला.

visit : Policenama.com