‘वो करे तो लीला…हम करे तो…जुर्म ! वाह मोदीजी वाह..!!’; खासदार इम्तियाज जलील यांचे टीकास्त्र

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – देशात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. ही रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्नही केले जात आहेत. त्यानुसार, गर्दी टाळण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मात्र, हरिद्वार येथे कुंभमेळ्यात झालेल्या गर्दीची एकच चर्चा सुरू आहे. त्यावरूनच एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष खासदार इम्तियाज जलील यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला. ‘वो करे तो लीला…हम करे तो…जुर्म! वाह मोदीजी वाह..!!’, असे त्यांनी म्हटले आहे.

कोरोनाबाधित रुग्णांची वाढती संख्या पाहता अनेक निर्बंध लावण्यात आले आहेत. त्यानुसार, कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी गर्दी न करण्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, महाकुंभमेळ्यात मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. त्यामध्ये अनेकांना कोरोना व्हायरसचा संसर्ग झाला. कुंभमेळ्याच्या बाराव्या दिवशी दुसरे शाही स्नान पार पडले. यामध्ये सहभागी झालेल्या 102 साधू व भाविकांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. त्यावरून खासदार जलील यांनी मोदी सरकारवर टीकास्त्र सोडले.

ते म्हणाले, ‘जर माझ्या शेजारचे छोटे दुकान बंद ठेवण्याचा आदेश दिला जात असेल तर विमानतळांवरील सर्व दुकाने नेहमीप्रमाणे का सुरू आहेत? नुकतीच मुंबई विमानतळावर ग्राहकांसह सर्व दुकाने सुरू असल्याचे पाहिले आहे’. तसेच महाकुंभमेळ्यात मोठ्या प्रमाणात झालेल्या गर्दीवर बोलताना त्यांनी म्हटले, की ‘वो करे तो लीला…हम करे तो…जुर्म! वाह मोदीजी वाह..!!’

दरम्यान, महाकुंभमेळ्यातील गर्दीवरून शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनीही भाष्य केले होते. ‘महाराष्ट्रात इतर राज्यांमधून लोक येत असून, तिथे नियंत्रण नाही ही विचार करण्याची गोष्ट आहे. हरिद्वारमध्ये लाखो लोक एकत्र आले. त्यावर नियंत्रण ठेवायला हवे होते. मात्र, महाराष्ट्रात गुढीपाडवा साजरा करण्यावर मुख्यमत्र्यांनी नियंत्रण आणले आहे. लोकांना आवडत नसले तरीही सरकारने केले आहे’, असे त्यांनी म्हटले होते.