गरज भासल्यास पुण्यात पुन्हा जनता ‘संचारबंदी’ लागू करा, पण नागरिकांना ‘त्रास’ आणि व्यापाऱ्यांचे ‘नुकसान’ होणार नाही याची खबरदारी घ्यावी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – मागील काही दिवसांपासून पुणे शहर आणि ग्रामीण भागात पुन्हा एकदा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने आरोग्य यंत्रणा हतबल झाल्याचे दिसत आहे. पुण्याच्या महापौरांनी कालच पुण्यात लॉकडाऊन केले जाणार नसल्याचे सांगितले असताना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी पुण्यात पुन्हा जनता संचारबंदी लागू करा, अशा सूचना प्रशासनाला दिल्या आहेत. संचारबंदी करताना नागरिक आणि व्यापार्‍यांना त्रास होणार नाही याची काळजी घ्या, असेही त्यांनी म्हटले.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोरोनाच्या सध्याच्या स्थितीचा आढावा आणि उपाययोजनांसदर्भात बैठक घेतली, यावेळी वरील सूचना केली. या बैठकीला विभागीय आयुक्त सौरभ राव, जमाबंदी आयुक्त एस. चोक्कलिंगम, पोलीस आयुक्त डॉ. के. वेंकटेशम, पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, पुणे महापालिका आयुक्त विक्रम कुमार, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख व अन्य अधिकारी उपस्थित होते.

या बैठकीत, अन्य राज्यांमध्ये आणि महाराष्ट्रातही अनेक ठिकाणी जनता संचारबंदी राबवण्यात येत असल्याचे जमाबंदी आयुक्त एस. चोक्कलिंगम यांनी निदर्शनास आणून दिले. यावर पवार म्हणाले की, गरज असल्यास पुण्यातही जनता संचारबंदी लागू करा. परंतु, हे करत असताना नागरिकांना त्रास आणि व्यापार्‍यांचे नुकसान होणार नाही याची खबरदारी घ्या.

यावेळी अजित पवार यांनी काही अधिकार्‍यांना फैलावर सुद्धा घेतले. शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या (सीओईपी) मैदानावरील मोठ्या करोना रुग्णालयाबाबत सतत तक्रारी येत असून ऑक्सीजन पुरवठ्याअभावी रूग्णांचे हाल होत असल्याने उपमुख्यमंत्र्यांनी अधिकार्‍यांना जाब विचारला. यापुढे अधिकार्‍यांची गय करणार नाही, थेट कारवाई करू, असा इशारा त्यांनी बैठकीत दिला.

केंद्रीय पद्धतीने खाटांचे व्यवस्थापन करा
नियोजनाच्या अभावामुळे पुण्यात बेड मिळत नसल्याने असंख्य कोरोना रूग्णांचे हाल होत आहेत. यासंदर्भात, मुंबई महापालिकेच्या खाटांच्या व्यवस्थापनाची माहिती एका अधिकार्‍याने दिल्यानंतर उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले की, कोरोनाबाधित झाल्यानंतर ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांनी रुग्णालयात भरती होण्यासाठी मुंबई महापालिकेशी संपर्क साधला होता. मुंबईत केंद्रीय पद्धतीने खाटा व्यवस्थापन होत असेल, तर पुण्यात का होत नाही?, पुण्यातील रुग्णांवर उपचार करण्यासाठी आणि त्यांना खाटा मिळण्यासाठी केंद्रीय पद्धतीने खाटा व्यवस्थापन करा.

सादरीकरण पुरे; परिणाम दिसू द्या
पुण्यातील सर्वात मोठे सीओईपी रुग्णालयात सावळागोंधळ सुरू असून येथे रूग्णांचे होणारे जीवघेणे हाल सध्या राज्यभरात चर्चेचा विषय झाले आहेत. याबाबत अधिकार्‍यांना फैलावर घेताना अजित पवार म्हणाले, जबाबदारी एकमेकांवर न ढकलता विभागीय आयुक्त, पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांनी एकत्रितपणे नियोजन करून परिस्थिती नियंत्रणात आणावी. किती वेळा तेच-तेच सांगायचे, आता खूप झाले. यापुढे तक्रारी आल्यास अधिकार्‍यांची गय करणार नाही. आता सादरीकरण पुरे; चांगले परिणाम दिसू द्या, असे म्हणत त्यांनी अधिकार्‍यांना सुनावले.