OBC नेत्यांनी मन मोठं केलं तर…, आरक्षणासह विविध मागण्यांसाठी मराठा क्रांती मोर्चाकडून मुंबईत विधानभवनावर धडक लाँग मार्च (व्हिडिओ)

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – मराठा समाजाच्या आरक्षणासह विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने मुंबईत अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे येत्या 8 डिसेंबरला विधानभवनावर धडक लाँग मार्च काढण्यात येणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली. तसेच ओबीसी नेत्यांनी मन मोठे केल्यास आरक्षणाचा प्रश्न न्यायालयाबाहेरच मार्गी लागेल, अशी भुमिकाही यावेळी मांडण्यात आली.

मराठा क्रांती मोर्चाची राज्यस्तरीय बैठक रविवारी (दि. 29) पुण्यात झाली. या बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत राजेंद्र कोंढरे ही माहिती दिली.

कोंढरे म्हणाले, सर्वोच्च न्यायालयाच्या स्थगितीनंतर मराठा समाजातील विद्यार्थ्यांच्या प्रवेशावर विपरीत परिणाम झाला आहे. अकरावी प्रवेशामध्ये अनेक विद्यार्थ्यांना सवलतीचा लाभ मिळणार नाही. वैद्यकीय प्रवेशाबाबत मंत्र्यांनी दिलेला शब्द पाळलेला नाही. एमएसईबी व इतर नोकरभरतीबाबत दिलेला शब्द फिरविला आहे. प्रत्येकवेळी मागण्यांकडे दुर्लक्ष केले जात आहे. याविरोधात अधिवेशनादरम्यान 8 डिसेंबरला राज्यभरातून मुंबईतील विधानभवनावर लाँग मार्च काढण्यात येणार आहे. तत्पूर्वी, दि.1 व 2 डिसेंबर रोजी राज्यभरातील महावितरणच्या अधिक्षक अभियंता कार्यालयासमोर निदर्शने केली जाणार आहेत.

हा मोर्चा बिगर राजकीय
खासदार छत्रपती संभाजीराजे आणि छत्रपती उदयनराजे यांच्या राजकीय भुमिकांना मराठा क्रांती मोर्चाचा पाठिंबा नसल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले. मोर्चा हा बिगर राजकीय असून दोन्ही छत्रपतींचा सामाजिकदृष्टीने पाठिंबा आहे. पण त्यांच्या राजकीय भुमिकेवर मोर्चा काही भाष्य करणार नाही, असे नमुद केले.

… तर प्रश्न न्यायालयाच्या बाहेरच मार्गी लागेल
मराठा समाजाची भावना आहे की, शरद पवार, उध्दव ठाकरे, राज ठाकरे यांच्यासह विविध नेते आणि विशेषत: ओबीसी नेत्यांनी मन मोठे केले आरक्षणाचा प्रश्न न्यायालयाबाहेरच मार्गी लागेल. संपुर्ण महाराष्ट्र त्याचे स्वागत करेल, अशी भुमिका राजेंद्र कोंढरे यांनी मांडली. तसेच यावेळी छगन भुजबळ यांच्या अन्य ओबीसी नेत्यांच्या दुटप्पी भुमिकेवर टीका केली.

You might also like