पोलिसांनी दुकाने बंद करण्यास सांगितल्यास 100 नंबर डायल करा : पोलिस आयुक्त

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  पुणे शहरातील कंटेन्मेंट झोन वगळता पुणे शहरातील दुकाने सकाळी सात ते सायंकाळी सात खुली ठेवण्यास परवानगी दिलेली आहे. त्यामुळे या वेळेत पोलिसांनी दुकाने बंद करण्यास सांगितल्यास, दुकानदरांनी थेट 100 नंबर डायल करावा व संबंधित पोलिसाची तक्रार करावी असे पुणे पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम यांनी स्पष्ट शब्दात सांगितले आहे.

पुणे महापालिका आयुक्तांनी काढलेल्या आदेशानुसार पुणे शहरात कंटेन्मेंट झोन वगळता अन्य भागातील दुकाने सकाळी सात ते सायंकाळी सात पर्यंत खुली ठेवण्याची परवानगी दिली आहे. असे असता देखील उपनगरांमध्ये अनेक ठिकाणी स्थानिक पोलीस अधिकारी तसेच कर्मचारी, दुकानदारांना दुपारीच दुकाने बंद करण्याची जबरदस्ती करत आहेत. याबाबत काही दुकानदारांनी पालिका आयुक्तांकडे तक्रार केली होती. त्यावेळी पालिका आयुक्तांनी पोलीस आयुक्तांशी बोलून पोलीस यंत्रणेकडून दिल्या जाणाऱ्या आदेशाचे उल्लंघन होत असल्याचे सांगितले होते. तसेच सकाळी 7 ते सायंकाळी 7 दुकाने बंद करण्यात येऊ नये असेही स्पष्ट केले होते.

परंतु अद्यापही स्थानिक पातळीवर पोलिसांकडून दुकानदारांना दुकाने 2 वाजता बंद करण्यास सांगण्यात येत आहे. तसेच दुकानदारांनी दुकाने बंद करण्यास नकार दिल्यास कायदेशीर कारवाई करण्याची भितीही घातली जाते. या पार्श्वभूमीवर विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसकर यांच्यासोबत झालेल्या पत्रकार परिषदेत पोलीस आयुक्तांना याबाबत विचारणा करण्यात आली होती. त्यावेळी त्यांनी हा प्रकार चुकीचा असल्याचे स्पष्ट करून, नियोजित वेळेत दुकाने बंद करण्याचे कोणते ही आदेश पोलीस यंत्रणेला दिले नसल्याचे स्पष्ट केले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करून, प्रशासनाने दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी करीत दुकाने उघडी असतील, आणि या ठिकाणी कोणी पोलिस अधिकारी अथवा कर्मचारी दुकान बंद करण्याची जबरदस्ती करत असतील तर संबंधित दुकानदाराने 100 नंबर डायल करून तक्रारी करावी असे सांगितेल.