मराठा आरक्षण : उदयनराजे भोसले यांचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल, म्हणाले – ‘तामिळनाडूत शक्य तर महाराष्ट्रात का नाही ?’

सातारा : पोलीसनामा ऑनलाइन – मराठा आरक्षणासाठी राज्य सरकारमध्ये इच्छाशक्तीचा अभाव दिसून येत आहे. तामिळनाडूत 50 टक्क्यांहून अधिक आरक्षण दिले आहे. तामिळनाडूत जास्त आरक्षण देणे शक्य आहे तर महाराष्ट्रात का नाही? असा खडा सवाल खासदार उदयनराजे भोसले यांनी केला आहे. तसेच मराठा आरक्षण प्रश्नी राज्य सरकारने श्वेत पत्रिका जाहीर करावी. या मुद्द्यावर सरकारच्या पातळीवर काय कार्यवाही सुरू आहे, हे जनेतेला कळायला हवे. आरक्षणाची स्थिती काय आहे, काय चाललंय आणि काय नाही? हे समजल पाहिजे अशी मागणीही त्यांनी केली आहे.

मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी मुंबईत बोलावलेल्या बैठकीत खासदार उदयनराजे भोसले यांनी आक्रमक भूमिका मांडली. खासदार उदयनराजे हे गेल्या काही दिवसांपासून विविध पक्षांच्या प्रमुख नेत्यांना भेटून त्यांनी मराठा आरक्षणाबाबत आग्रही भूमिका मांडली आहे. गायकवाड आयोगाने दिलेल्या अहवालात राज्यातील 70 टक्के मराठा समाज मागास असल्याचे म्हटले आहे. दुसरीकडे सरकार ईसीबीसी सवलत लागू करत आहे. हा कोर्टाचा अवमान आहे. मराठा समाजाच्या विकासाठी स्थापन केलेल्या सारथी सारख्या संस्था अखेरच्या घटका मोजत असल्याचेही ते म्हणाले.