Pune : मनपाला साधा ‘डॅशबोर्ड’ अपडेट करता येत नसेल तर सत्ताधार्‍यांनी राजीनामे द्यावे, काँग्रेसनं सुनावलं

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोनाने बाधितांची संख्या वाढत आहे. त्यामुळे शहरातील कोणत्या रुग्णालयातील बेडसंदर्भात माहिती देणारा एक डॅशबोर्ड महापालिकेने तयार केला आहे. मात्र तो अपडेट नाही. त्यामुळे नातेवाईकांना वणवण फिरावे लागत आहे त्यावरून काँग्रेसने सत्ताधारी भाजपवर हल्लबोल केला आहे. महापालिकेला जर माहितीचा डॅशबोर्डही अपडेट ठेवता येत नसेल तर भाजपने सत्तेतून पायउतार व्हावे अशी टीका काँग्रेसने केली आहे.

काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते गोपाळ तिवारी म्हणाले की, शहरातील आरोग्य व्यवस्थेचे धिंडवडे निघत आहे. सात सात दिवस डॅशबोर्ड अद्ययावत केला जात नाही. त्यामुळे जर कोणी हा डॅशबोर्ड पहिला तर कोठे जावे हे समजत नाही. नागरिकांचे हाल होत असून याला भाजपचे पदाधिकारीच जबाबदार आहेत.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि कोथरूडचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी काही दिवसांपूर्वी २ हजार बेड देणार असल्याची घोषणा केली होती. त्यावरूनही तिवारी यांनी निशाणा साधला. ते म्हणाले, पुणेकरांनी आपल्याला मते दिली ती केवळ ठराविक लोकांचाच विचार करण्यासाठी नाही. शहराची आरोग्य व्यवस्था कशी सुधारेल याकडे लक्ष द्या, नाही तर पुणेकरांना याचे जाहीर ऊत्तर द्या अशी मागणी तिवारी यांनी केली.

संकटातही राजकीय फायदा उचलण्याचा प्रयत्न करणे हि निंदनीय गोष्ट आहे. भाजपचे चंद्रकांत पाटील यांच्यासह पदाधिकारी तेच करत आहेत. डॅशबोर्ड रोजच्या रोज अपडेट करा, त्याचा वापर करण्याविषयी नागरिकांना आवाहन करा, शहरातील सगळी आरोग्य व्यवस्था सुधारेल असे निर्णय घ्या असे आवाहन करत जर काही जमत नसेल तर राजीनामे द्या, प्रशासनाला त्यांचे काम करू द्या असेही तिवारी म्हणाले.